ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार
चांदूर बाजार : शहरातील ग्रामीण रुग्णालयातील कोविड रुग्णालयातून कोरोना संक्रमित रुग्णाने पलायन केले. या घटनेबाबत प्रभारी वैद्यकीय अधीक्षक अनभिज्ञ असल्याने ग्रामीण रुग्णालयाचा कारभार एकदा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
तालुक्यातील पिंपळखुटा येथील ६० वर्षीय कोरोना रुग्णाला १३ जून रोजी येथील ग्रामीण रुग्णालयात असलेल्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथे राहण्यास नकार देत सदर रुग्णाने १४ जून रोजी रात्री रुग्णालयात धिंगाणा घातला. यानंतर सदर रुग्ण हा १५ जून रोजी पहाटे ४ वाजता कारण न सांगता रुग्णालयातून बाहेर पडला, अशी माहिती कोविड रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी धीरज टिकोडे यांनी दिली. बराच वेळ रुग्ण रुग्णालयात न परतल्यामुळे वैद्यकीय यंत्रणा हादरून गेली होती.
पिंपळखुट्यात आढळला रुग्ण
घटनेची माहिती स्थानिक पोलीस व तालुका वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आली. पोलिसांनी पिंपळखुटा येथील पोलीस पाटलांना सूचना दिली. तो त्याच्या घरीच आढळून आला. पोलीस पाटलांनी त्याची समजूत घालून परत चांदूर बाजार येथील कोविड रुग्णालयात दाखल केले.
वैद्यकीय अधीक्षक म्हणतात, असे घडलेच नाही
प्रभारी वैद्यकीय अधीक्षक संध्या साळकर यांना विचारणा केली असता, सदर घटना घडलीच नसल्याचे त्यांनी सांगितले. कोविड रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी धीरज टिकोडे यांनी मात्र घटनेला दुजोरा दिला. सायंकाळी ५ वाजता पिंपळखुटा येथील पोलीस पाटील यांनी सदर रुग्णाला परत आणले. तो मनोरुग्ण असल्याची माहितीही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.