मोर्शी : स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांना इंजेक्शन देताच अंगात थंडी भरली. दोन रुग्णांना अमरावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर दुसरीकडे नेहमीचीच इंजेक्शन देऊन उपचार केल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. २३ ऑगस्ट रोजी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कारवाईची मागणी रुग्णांच्या नातेवाइकांनी केली आहे.
सूत्रांनुसार, सध्या मोर्शी तालुक्यात डेंग्यूचा मोठ्या प्रमाणात प्रकोप सुरू असून, दररोज रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. २३ ऑगस्टला स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात रात्री ९ च्या सुमारास डॉक्टरांनी दाखल रुग्णांची तपासणी करून त्यांच्या आजाराप्रमाणे औषधे व इंजेक्शन दिले. तेथे उपस्थित रुग्णांनुसार, मंगळवारी रात्री दिलेल्या इंजेक्शनमुळे अनेक रुग्णांना अचानक थंडी वाजू लागली. त्यामुळे तेथे भीतीचे वातावरण पसरले होते. दोन ते तीन रुग्णांना अधिकच त्रास होऊ लागल्याने त्यांना अमरावती येथे हलविण्यात आले. यापैकी बेलोना येथील सौरभ दंडाळे (२२) या युवकाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी ताप असल्यावरसुद्धा इंजेक्शन व सलाईन दिल्यामुळे या रुग्णांना अचानक थंडी वाजू लागल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. वृत्त लिहिस्तोवर कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.
-----------
सुविधेची वानवा
मोर्शी शहरातील उपजिल्हा रुग्णालय या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहते. रुग्णालयात अनेक जागा रिक्त असून पाहिजे त्या प्रमाणात सुविधा नाहीत. ग्रामीण रुग्णालयाचे नामकरण उपजिल्हा रुग्णालय झाले असले तरी त्यामध्ये सुविधा नसल्याने वरचेवर पेशंटला अमरावती येथे रेफर केले जातात, ही शोकांतिका आहे.
----------
रुग्णांना नियमानुसारच व जी आवश्यक होती तीच इंजेक्शन दिली. सर्व रुग्ण व्यवस्थित आहेत. जो रुग्ण दगावला, त्याला डेंग्यू झाला होता व त्याच्या प्लेटलेट कमी झाल्या होत्या. त्यामुळे त्याला अमरावती येथे दाखल करण्यात आले होते.
- डॉ. कृणाल वानखडे, उपजिल्हा रुग्णालय, मोर्शी
______
रुग्णांना थंडी वाजून ताप आला होता. परंतु, ते लगेच बरे झाले. मात्र, दोन रुग्णांना डेंग्यू असल्याने त्यांचे प्लेटलेट कमी झाले होते. बीपी कमी असल्याने त्यांना अमरावती येथे दाखल करावे लागले. तेथे एका रुग्णाचा खासगी दवाखान्यात मृत्यू झाला.
- डॉ. सचिन कोरडे, प्रभारी अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, मोर्शी