लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील विविध रस्त्यांवर फुटपाथ तयार करण्यात आले खरे, पण अनेक भागांत हे फुटपाथ हातगाड्यांनी बळकावले आहेत. महापालिकेचे दुर्लक्ष आणि हातगाडीवाल्यांच्या डोक्यावरील राजकीय वरदहस्तामुळे सर्वसामान्यांचा पायी चालण्याचा अधिकारच हिसकावला. राजकीय हस्तक्षेपामुळे फुटपाथवरील हातगाड्या हटविण्यास महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक कानाडोळा करीत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून जावे लागत आहे. इर्विन ते रेल्वे स्टेशन रोडवरील फुटपाथ व रस्ता गॅरेजधारकांनी गिळंकृत केला आहे.रेल्वे स्टेशन चौक ते इर्विन चौकापर्यंत मागील वर्षी रुंद असा सिमेंट रस्ता बांधण्यात आला. रेल्वे स्टेशनच्या बाजूची जागा रेल्वेच्या अखत्यारीतील असल्याने नवीन रेल्वे स्थानकाला लागून फारसे अतिक्रमण नाही. मात्र, नव्या रेल्वे स्टेशनसमोरील रस्त्याच्या शेजारी हॉटेल, दुचाकी शोरूम, पानटपऱ्या आहेत. त्या रस्त्यावर काही गॅरेजदेखील आहेत. त्या गॅरेजमध्ये येणारी शेकडो वाहने फुटपाथ व रस्त्यावर लागतात. शवागाराच्या आधीदेखील ती रस्त्याशेजारची जागा वाहन दुरुस्ती करणाऱ्यांनी बळकावली आहे, तर दुचाकी शोरूमलगत असलेल्या गॅरेजवाल्यांनी फुटपाथ व अर्धा रस्ता कवेत घेतला आहे. त्याकडे अतिक्रमण निर्मूलन विभाग व वाहतूक शाखेने दुर्लक्ष चालविले आहे. तेथील गॅरेजसमोर रोज १००/ १५० वाहने अस्ताव्यस्त फुटपाथवर लावलेली असतात.चित्रा चौकातून इतवारा बाजाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर रांगेत हातगाड्या लागतात. या हातगाडीकडे येणारे अनेक जण भररस्त्यावर दुचाकी उभ्या करतात. शहरातील मुख्य बाजारपेठेत फुटपाथ नसल्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना रस्त्यांवरूनच वाहने चुकवत पायी जावे लागते. व्हीआयपी रस्त्यावर काही ठिकाणी फुटपाथ आहेत. मात्र तेही गायब झाले. काही ठिकाणी फुटपाथवर हातगाड्या, तर काही ठिकाणी पार्किंगसाठी जागा करून घेण्यात आली.
फुटपाथचा वापर हातगाड्यांसाठी - शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून विविध रस्त्यांवर फुटपाथ तयार करण्यात आले. या फुटपाथचा उपयोग शहरवासीयांना चालण्यासाठी व्हावा, असा उद्देश होता. मात्र या फुटपाथचा वापर हातगाड्या उभ्या करण्यासाठी केला जात आहे. महापालिकेच्या बाजूला असलेल्या अंबादेवी मार्गावरील फुटपाथवर गेल्या अनेक वर्षांपासून कपडे, कपबशी आणि अन्य हातगाड्या लावण्यात आल्या आहेत.