शेतकरी हताश : पालकमंत्र्यांच्या आदेशाला ‘खो’अमरावती : पांदण रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचे शासनाचे धोरण असताना जिल्ह्यातील असे रस्ते गिळंकृत करण्याचा डाव रचला जात आहे. बडनेरानजीक अंजनगाव बारी येथील शेत सर्वे क्र. ३/१२, २/१ मधून जाणाऱ्या पांदण रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले असताना आद्याप कारवाई झाली नाही, हे विशेष.भाजपच्यावतीने विश्वजित डुमरे यांच्या नेतृत्वात पालकमंत्री प्रवीण पोटे व जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदन देऊन पांदण रस्ता गिळंकृत होण्यापासून वाचविण्याची मागणी करण्यात आली आहे. या रस्त्यावर एका शेतमालकाने पोल्ट्री फार्म साकारला असून ये-जा करण्यासाठी कोणतीही जागा सोडली नाही. त्यामुळे हा पांदण रस्ता अतिक्रमण मुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच बडनेरा जुनीवस्ती येथील मुरलीधर लाडदेखील मौजा म्हसला शेत सर्वे क्र. २/२ अ, २/२ मधील गावठाण लगत जाणारा पांदण अतिक्रमित रस्ता मोकळा करण्याची मागणी केली आहे. प्रमोद मेटकर व दिलीप मेटकर यांनी शेत सर्वे क्र. ३/२, २/१ मधून जाणाऱ्या पांदण रस्त्यावर अतिक्रमण करुन पोल्ट्री फार्म निर्माण करण्यात आले आहे. या दोन्ही शेत सर्वे क्रमांक एकत्र करून तारांचे संरक्षण कुंपण निर्माण करण्यात आले आहे. हा पांदण रस्ता वडिलोपार्जित असताना त्यावर अतिक्रमण करून शेतकऱ्यांना त्रास दिला जात आहे. पाणंद रस्यावर झालेल्या अतिक्रमणासंदर्भात नायब तहसीलदारांनी सुनावणीदेखील घेतली आहे. मात्र पांदण रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यास विलंब का लागत आहे, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. दुसरीकडे प्रशासन पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यास नकारात्मक भूमिका घेत असल्याने ही बाब अतिक्रमितांना पोषक ठरत आहे. पांदण रस्ते अतिक्रमित झाल्याप्रकरणी तहसीलदार सुरेश बगळे यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.यासाठी गजानन गव्हाळे, राजू वानखडे, भाऊराव गडलिंग व इतर शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारी दिल्या आहेत. (प्रतिनिधी)
पांदण रस्ते गिळंकृत !
By admin | Published: November 24, 2015 12:27 AM