लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बालभारतीने विद्यार्थ्यांकरिता ई-बालभारती ऍप उपलब्ध केले आहे. परंतु, या ऍपवरील साहित्य वाचनाकरिता विद्यार्थ्यांना पैसे मोजावे लागणार असल्याने पालकांत नाराजीचा सूर उमटला आहे. याकरिता ५० रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात आले असून जीएसटी तसेच इतर शुल्कही आकारले जाणार आहेत. शिक्षणहक्क कायद्यानुसार राज्यात शिक्षण मोफत आहे. मात्र, अभ्यास साहित्याकरीता पैसे मोजावे लागतील तर मग मोफत शिक्षण हक्क कायदा उरला तरी कोठे, असा सवाल उपस्थित होत आहे. बालभारतीचे ई-साहित्यही मोफत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी पालकांनी सुरू केली आहे.
कोरोनात अनेक पालकांचे रोजगार गेले. ग्रामीण भागातील नागरिक जेमतेम परिस्थितीतून वाट काढत आहेत. विद्यार्थ्यांना स्मार्टफोन घेऊन देण्याकरिता पालकांजवळ पैसे नसल्याने त्यांनी ऑफलाईन शिक्षण सुरू करावे, अशी मागणी होत आहे. अशा परिस्थितीत बालभारतीने सशुल्क ऍप सुरू करणे चूकच आहे, असे पालकांचे म्हणणे आहे. सर्व विद्यार्थ्यांना ही सुविधा मोफत उपलब्ध करून द्यावी, बालभारतीने पालकांच्या समस्यांची दखल घ्यावी, अशी बालभारतीने मागणी जोर धरत आहे. विद्यार्थ्यांना ई-साहित्य उपलब्ध होण्याकरिता बालभारतीच्या वेबसाईटवर पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. दीक्षा ऍपवर व्हिडीओही उपलब्ध करून दिले आहेत. याहीपेक्षा विद्यार्थ्यांना अतिरिक्त अभ्यास करायचा असेल, तर ई-बालभारती विभागाकडून शैक्षणिक साहित्य निर्माण केले असून, या शैक्षणिक साहित्याकरिता पैशांची आकारणी केली जाणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत गरीब,गरजु विद्यार्थी शिक्षकतात त्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, महापालिका व नगर परिषदेमधील विद्यार्थ्यांकरिता बालभारतीने मोफत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.
- राजेश सावरकर, राज्य प्रतिनिधी, म.रा. प्राथमिक शिक्षक समिती