चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक संपन्न
लॉकडाऊन व रमजान ईदसंदर्भात ठाणेदार मगन मेहते यांनी दिल्या सूचना
प्रशासनाला सहकार्य करण्याचे केले आवाहन
चांदूर रेल्वे - (ता. प्र.)
अमरावती जिल्ह्यात संचारबंदीतील निर्बंध आणखी कडक करण्यात आले असून १५ मेपर्यंत लॉकडाऊन सुरू आहे. तसेच तीन दिवसांनंतर रमजान ईद येणार आहे. याच पार्श्वभूमीवर चांदूर रेल्वेच्या पोलीस स्टेशनमध्ये रविवारी शांतता समितीची बैठक घेण्यात आली. सर्व नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन ठाणेदार मगन मेहते यांनी केले.
अमरावती जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचे वाढते प्रमाण पाहता संपूर्ण जिल्ह्यात ९ मे रोजी दुपारी १२ वाजतापासून १५ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला आहे. या आदेशानुसार, कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. दुकाने पूर्णपणे बंद राहतील. तथापि, या सर्व दुकानांना सकाळी ७ ते सकाळी ११ या कालावधीत घरपोच सेवा चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे या आदेशाचे सर्वांनी पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन ठाणेदार मगन मेहते यांनी केले. तर येत्या १३ किंवा १४ मे रोजी रमजान ईद हा सण येणार आहे. यंदा ईदगाहवर सामूहिक नमाज पठन होणार नसून सर्वांनी घरी नमाज पठन करावे, असेही आवाहन ठाणेदारांनी केले. या बैठकीला नगराध्यक्ष शिट्टू ऊर्फ नीलेश सूर्यवंशी, शेख राहिल, सय्यद जाकीर, अशोक जयस्वाल, पत्रकार युसूफ खान, बाळासाहेब सोरगिवकर, इरफान खान, मुरलीधर सराड, सुरेश मेश्राम, ॲड. राजीव अंबापुरे, गणेश आरेकर, सतीश जयस्वाल, समीर जानवानी, प्रशांत माकोडे, सुनील राऊत, महेश कलावटे, सतीश देशमुख, नंदकिशोर खेरडे, सतपाल वरठे, अनिस सौदागर, नुरुलहसन कुरेशी, कारी साजीद, त्रिलोक मानकानी, अनिल माहूलकर, प्रमोद नागमोते, खुपिया अरुण भुरकाडे आदींची उपस्थिती होती.