दर्यापूर : दहावीच्या निकालात विदर्भात टॉपर असलेल्या मयूर प्रदीप कदम याला आणखी परिश्रम घेऊन आयएएस अधिकारी व्हायचे आहे. जिल्हा बँकेत शिपाई असलेल्या वडिलांनी आपल्या स्वप्नांना पंख व आईने उंच भरारीचे बळ दिल्याचे निकालानंतर ‘लोकमत’शी बोलताना त्याने सांगितले.प्रबोधन विद्यालयाचा विद्यार्थी मयूर याने दहावीच्या परीक्षेमध्ये ५०० पैकी ४९५ गुण (९९ टक्के) प्राप्त केले. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत जाण्याचा त्याचा मानस आहे. पहाटे ४ वाजता उठून सलग अभ्यास करण्यावर त्याने भर दिला. मोबाइल, समाजमाध्यमांपासून दूर अंतरावर राहिलेल्या मयूरने कठोर परिश्रमाने हे यश मिळविले. शाळेमध्ये शिकविलेल्या अभ्यासाची वारंवार उजळणी केल्याने आपण हे यश मिळविल्याचे त्याने सांगितले. यशाचे श्रेय शिक्षक, आई वडील, आजोबा व नातेवाइकांना आहे. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र गणोरकर, प्राचार्य मेधा धर्माधिकारी यांनी मार्गदर्शन केल्याचे त्याने सांगितले.
मयूरला व्हायचेय आयएएस अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 1:30 AM