धामणगाव रेल्वे : जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले असताना गावातील किराणा दुकाने खुली ठेवल्यामुळे भरारी पथकाने या दुकानदारांना दंड देत ती सील केली.
पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी माया वानखडे यांच्या नेतृत्वातील पंचायत विस्तार अधिकारी किशोर चव्हाण व मिलिंद ठुनुकले यांच्या पथकाने वाठोडा, कावली, वसाड, चिंचपूर, शिदोडी, झाडा, आष्टा, गिरोली, झाडगाव, चिंचोली, बोरगाव धांदे, भातकुली, विटाळा, वकनाथ, बोरवघळ या गावांत भरारी पथकाने दौरा केला. उघड्या किराणा दुकानदारांना नोटीस बजावण्यात आली व दंड देण्यात आला आहे. सदर दुकाने आगामी आठ दिवसांकरिता सील करण्यात आली. काही हॉटेलचालकांनादेखील नोटिसा बजावण्यात आल्या. यावेळी केंद्रप्रमुख दिलीप चव्हाण, कृषी विस्तार अधिकारी दीपक वाडेकर, पंचायत समितीचे कनिष्ठ सहायक एस. व्ही. रत्नपारखी, विशाल सुटे, संतोष वानखडे यांच्यासह सदर ग्रामपंचायतचे सरपंच, सचिव, आशा स्वयंसेविका यांनी सहकार्य केले.
कोरोनाचा संसर्ग कायम
धामणगाव तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कायम आहे. दरम्यान मंगळवारी तालुक्यात एकाच दिवशी ४३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले असतानाही अनेक गावांत कट्ट्यावर बसणे, मास्क न वापरणे, दुकाने खुली ठेवणे हे सर्रासपणे सुरू आहे.