अमरावती : क्षारयुक्त पाण्यामुळे किडनी स्टोन होऊन तडफडत प्राण गमावणे हेच जनुनावासीयांचे विधिलिखित असावे, अशी स्थिती गेल्या अनेक वर्षांपासून आहे. या आजाराने प्रत्येक घरातील सदस्य ग्रासलेला आहे, तर अनेकांनी प्राण गमावले आहेत. अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या मेळघाटातील प्रत्येक गावात काही गोष्टी समान आहेत. पायाभूत सुविधांचा अभाव आणि शुद्ध पेयजल नसणे हे त्यापैकी प्रमुख.
मेळघाट हे आधीपासूनच अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. याच मेळघाटात असणारे, पण अचलपूर तालुक्याच्या टोकावरील जनुना हे गाव जेमतेम दोन हजार लोकवस्तीचे. या गावात अनेक वर्षांपासून पाणीपुरवठ्याचा स्रोत म्हणजे भूगर्भातील क्षारयुक्त पाणी. विहिरीतून ओढून घागरीत आणि थेट घशात. ना तपासणी, ना फिल्टर. यामुळे गेल्या काही वर्षांत या गावातील अनेक जण मूत्राशयाचा विकार बळावल्याने दगावले आहेत. आजदेखील गावात अनेकजण आजारी आहेत.
जनुना गावातील या गंभीर परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला असता, या गावातील प्रत्येक घरात मूत्राशयाचा विकार असलेले रुग्ण आहेत. शिक्षणाचा अभाव व अंधश्रद्धेमुळे गावातील अनेकांनी आपल्याला होणाऱ्या वेदना, आपला आजार यासंदर्भात कुठल्याच तपासण्या केल्या नाहीत. मात्र, असह्य वेदनेने घरातच विव्हळणारे अनेक जण या गावात पाहायला मिळतात. यापैकी काही रुग्ण स्वत:हून पुढे अकोल्याच्या डॉक्टरांकडे, तर काही रुग्ण परतवाडा आणि अमरावती येथील डॉक्टरांकडे उपचार घेत आहेत.
गावात आरोग्य केंद्रच नाही
परतवाडा-अकोला मार्गावर असणाऱ्या पथ्रोट गावापासून १८ किलोमीटर अंतरावर उंच पहाडावर जनुना हे गाव आहे. शहानूर धरणापासून उंचावर सुमारे पाच किलोमीटर अंतरापर्यंत गावात जाण्यासाठी पक्का रस्ताच नाही. गावामध्ये कुठलाही दवाखाना नाही. गावातील रुग्णांना उपचारासाठी पथ्रोट हे गावच गाठावे लागते.
सहा महिन्यांपासून डायलिसिसक्षारयुक्त पाण्यामुळे मूत्रपिंडाचा विकार झाल्यामुळे सुरेश महारनार हा २८ वर्षीय तरुण डायलिसिसवर आहे. त्याने अकोला येथील डॉक्टर भुसारी यांच्याकडे उपचार घेतला. गेल्या सहा महिन्यांपासून परतवाडा येथील तालुका रुग्णालयामध्ये त्याच्यावर डायलिसिस केले जात आहे. गावातील पिण्याच्या पाण्यात क्षार असल्यामुळे माझ्यासह अनेकांची अशी अवस्था झाल्याचे सुरेश महारनार याने सांगितले.
काय झाले शुद्ध पाणीपुरवठ्याच्या आश्वासनाचे?शहानूर धरणातील पाणी दीडशे किलोमीटर लांब अंतरावर असणाऱ्या खारपाणपट्ट्यातील २३५ गावांना पुरविले जाते. ते पाणी दर्यापूर भातकुली तालुक्यात जात असताना धरणापासून अवघ्या चार ते पाच किलोमीटर अंतरावरील जनुना गावात पोहोचत नाही, ही खरी शोकांतिका आहे. दोन वर्षांपूर्वी गावात प्रत्येक घरात रुग्ण आढळून आल्यावर पिण्याचे शुद्ध पाणी गावात पुरविले जाईल, असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत गावात पिण्यायोग्य पाणी मिळाले नाही.