लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: कोरोना महामारी रोखण्यात सर्व आघाड्यांवर महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले असून जनतेच्या जीवाशी होणारा खेळ थांबविण्यासाठो केंद्र सरकारने तात्काळ महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी खासदार नवनीत रवी राणा यांनी केली. महाराष्ट्र व विदर्भाला तसेच अमरावती जिल्ह्याला पुन्हा भरीव मदत करावी अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली.कोरोनाच्या या महामारीत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य सेवक, सफाई कर्मचारी, पोलीस, पत्रकार यांना मानाचा मुजरा करून, या लढ्यात ज्या कोरोना योद्ध्यांनी आपले प्राण गमावले त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करून राणा यांनी स्वत:च्या अनुभवावरून आपबीती लोकसभेत मांडली.रविवारी लोकसभेत नियम 193 अंतर्गत देशातील कोरोना स्थितीवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत सहभागी होऊन त्यांनी अत्यंत भावुक पण तेवढेच वस्तुनिष्ठ व मार्मिक विवेचन स्वानुभवावरून केले. आपण, आपले पती आमदार रवी राणा व संपूर्ण कुटुंबातील 18 सदस्य या अग्निदिव्यातून गेलो असून कोरिनाग्रस्तांच्या सर्व समस्या अनुभवल्या आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती भयावह आहे. बेड-व्हेंटिलेटर-आॅक्सिजन-मास्क-इंजेक्शन आदींचा प्रचंड तुटवडा आहे. रुग्णांना बेड नाही हॉस्पिटलची संख्या कमी आहे. उपचाराअभावी अनेक रुग्ण तडफडून प्राण सोडत आहेत. खाजगी दवाखान्यांची अधिग्रहण मर्यादा 10% वरून 50%करावी व नागरिकांची सोय करावी अशी मागणी त्यांनी पुढे केली.सध्या खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या नावावर प्रचंड लूट सुरू असून एकेका रुग्णाकडून 2 ते 12 लाख रुपये लुटले जात आहेत. केंद्र सरकारने आकस्मिक कायदा लागू करून या रुग्णालयांच्या व्यवस्थापनावर कडक कारवाई करावी व गोरगरीब रुग्णांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.
सध्या विदर्भात ऑक्सिजन चा प्रचंड तुटवडा असून केंद्रीय आरोग्य विभागाने आयनॉक्स नावाच्या कंपनीला पश्चिम विदर्भात 5 जिल्ह्यांमध्ये रोज एक ऑक्सिजन टँकर पुरविण्याचे निर्देश द्यावे असा आग्रहही त्यांनी केला. सध्या या आजारासाठी उपयुक्त असणारे रेमेडीसिवर व इंजेक्शन काळ्या बाजारात विकून रुग्णांना हजारो रुपयांची लूट केली जात आहे यामुळे काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली.
सरतेशेवटी आपबीती मांडताना महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील उद्रेक त्यांनी सभागृहात मांडला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेला वाऱ्यावर सोडून मातोश्रीत बसुन 'माझे कुटुंब- माझी जबाबदारी' ची घोषणा करतात पण माझा महाराष्ट्र -माझी जबाबदारी असे मात्र म्हणत नाहीत. त्यांनी 80 वर्षांचे योद्धा शरद पवार साहेब यांचा आदर्श घेऊन महाराष्ट्रात फिरावे असा आग्रहही केला.