अमरावती: सुधारित नागरिकत्व कायदा ‘सीएए’, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी ‘एनआरसी’ व नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर ‘एनपीआर’ या तीनही मुद्यानविरोधात गुरुवारी चांदूरबाजार शहरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत होऊन तीनही कायद्यांची अंमलबजावणी होता कामा नये, याबाबत डोळ्यात तेल घालून सजग राहायला हवे, असे आवाहन करण्यात आले. सुमारे एक हजार फुट लांबीचा तिरंगा ध्वज यावेळी रॅलीचा आर्षण ठरला.
संविधान बचाव संघर्ष समिती, प्रहार जनशक्ती पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस, जमात-ए-उलेमा हिंद, भारतीय बौद्ध महासभा, बामसेफ, आक्रमण संघटना, रणवीर संघटना, बोहरा जमात कमेटी, बहुजन क्रांती मोर्चा, क्रांतीज्योती ब्रिगेड, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, इत्यादी पक्ष व संघटनांचा रॅली व सभेमध्ये सहभाग होता. सर्वप्रथम स्थानिक आठवडी बाजारातील मिरची साथीमध्ये सभा घेण्यात आली.
चार तास चाललेल्या या सभेला हजारो नागरिक उपस्थित होते. दुपारी ३ वाजता सभेचे रूपांतर रॅलीत झाले. ही रॅली नेताजी चौक, जयस्तंभ चौक, किसान चौक, शहराच्या मुख्य रस्त्याने तहसील कार्यालयात नेण्यात आली. या ठिकाणी तहसीलदारांना संबंधित कायद्याला विरोध दर्शविणारे निवेदन देण्यात आले. चांदूर बाजारात आजवरच्या इतिहासात अशी मोठी रॅली नागरिकांनी प्रथमच अनुभवली. सभा व रॅलीत मुस्लिम समुदायाची उपस्थिती लक्षणीय होती. रॅलीचे आकर्षण ठरलेला आठ फूट रुंद व एक हजार फूट लांबीचा तिरंगा स्थानिक काजीपुºयातील मुस्लिम तरूणांनी तयार केला होता. याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमय मुंडे याच्या मार्गदर्शनात स्थानिक व जिल्हास्तरावरील पोलिसांनी सांभाळली.