लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दीड महिन्यांपासून पॉझिटिव्ह कोरोना चाचण्यांचे १२ ते १८ टक्क्यांदरम्यानचे प्रमाण दिवाळीपश्चात अचानक वाढू लागल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. सोमवारी तपासणीसाठी पाठविलेल्या एकूण नमुन्यांपैकी पॉझिटिव्ह चाचण्यांचे प्रमाण २१ टक्के तर रविवारी ते तब्बल १०० टक्के नोंदविले गेेले. जिल्ह्यात कोरोना संर्सगाचे आठ महिन्यांच्या कालावधीत १,०४,९८१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये पॉझिटिव्ह नमुन्यांचे प्रमाण सरासरी १६.१३ टक्के आहे. सप्टेंबर महिन्यात चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आढळण्याचे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत पोहोचले होते. किंबहुना या महिनाभरात जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक होऊन महिनाभरात नऊ हजारांवर कोरोनाग्रस्तांची नोंद झाली होती. त्यानंतर हे प्रमाण हळूहळू कमी होत असताना, दिवाळीपश्चात पुन्हा दोन दिवसांत चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हिटीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. विशेष म्हणजे, महत्त्वपूर्ण असणाऱ्या आरटी-पीसीआर चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हिटीचे प्रमाण वाढले असल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार, जिल्ह्यात आतापर्यंत १,१५,८९७ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यापौकी १,१५,५४० व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यामध्ये १,१३,०६३ व्यक्तींनी क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला असल्याने त्यांना मुक्त करण्यात आले. सध्या २,१७६ व्यक्ती क्वारंटाईनमध्ये व ३९३ रुग्ण आयसोलेशन वाॅर्डात आहेत. आतापर्यंत १.०४,९८१ व्यक्तींच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली. यापौकी ८७,५७४ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह, तर आतापर्यंत१६,९४२ नमुने पॉझिटिव्ह आलेले आहेत. ७० नमुन्यांचे अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत.ट्रूनेट चाचण्यांचे प्रमाण १५.१ टक्के जिल्ह्यात ट्रूनेट मशीनद्वारे ४१७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ६३ नमुने पॉझिटिव्ह आलेले आहेत. हे प्रमाण १५.१० टक्के आहे. या चाचणीत नमुना पॉझिटिव्ह आल्यानंतर पुन्हा आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येते.
पीडीएमसी चाचण्यांत ३३.९९ टक्के पॉझिटिव्हपीडीएमसीच्या लॅबमध्ये आतापर्यत आरटी-पीसीआरचे ४१०४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १३५४ नमुने पॉझिटिव्ह आले. हे प्रमाण ३३.९९ टक्के आहे. २६८३ निगेटिव्ह, तर ६७ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
विद्यापीठ चाचण्यांचे १८.३१ टक्के संत गाडगेबााब अमरावती विद्यापीठाच्या विषाणू परिक्षण प्रयोगशाळेत आरटी-पीसीआरच्या ५२,१०४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये पॉझिटिव्हिटीचे प्रमाण १८.३१ टक्के आहे. ४२,२३६ नमुने निगेटिव्ह आलेत. अद्याप ७० नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
रॅपिड अँटिजनचे ११.४३ टक्के प्रमाणमहापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात रॅपिड अँटिजनच्या ४४,०८९ चाचण्या करण्यात आल्यात. यामध्ये ११.४३ टक्के अहवाल पॉझिटिव्ह आला. यात शहरी भागात १३.३२ टक्के, तर ग्रामीण भागात ७.४१ टक्के पॉझिटिव्हिटीचे प्रमाण आढळून आले.