अंजनगाव सुर्जी : महाबीजने दिलेल्या सोयाबीन बियाणे परवाण्यावर अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे उपलब्ध न झाल्यामुळे अखेर २१ जूनला प्रहार शेतकरी संघटनेने तालुका कृषी कार्यलयात २ तास ठिय्या देऊन वांझोट्या परवान्याची होळी केली व महाबीजचा निषेध नोंदविला.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२१ साठी अनुदानावर सोयाबीन बियाणे महाबीज मार्फत देण्याचे नियोजन केले होते. त्या अनुषंगाने अंजनगाव सुर्जी तालुक्यात लकी ड्रॉ मार्फत ३८१ शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे मिळणार होते. परंतु बियाण्याची उचल शेतकऱ्यांनी करण्यापूर्वीच महाबीजने खुल्या बाजारात सोयाबीन विकण्याची परवानगी कृषिकेंद्र चालकांना दिल्याने परवानाधारक शेतकरी बियाण्यापासून वंचित राहिले. यावर प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सनी शळके यांनी २ दिवसात बियाणे उपलब्ध करून घ्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनात दिला होता. त्यानुसार सोमवारी प्रहार शेतकरी संघटनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी तालुका कृषी कार्यलयात ठिय्या देत महाबीजच्या अधिकाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी करीत महाबीजने दिलेल्या परवान्याची होळी केली. यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सनी शेळके, विजय पळसकर, श्रीकांत वाघ, शंभू मालठाणे, राजेश ढोक, निखिल कडू, राजेश चिंचोळकर, पिंटू सदार, सुदर्शन तराळ, मुन्ना घोरड, बाळा खारोडे, अनंता मते, छोटू अढाऊ, राम नळकांडे, शुभम निमकाळे, निवृत्ती गळसकर, अक्षय गायगोले, शाम धुमाळे उपस्थित होते.