संत्रा उत्पादक हवालदिल : लाखो रुपयांचे नुकसान संजय खासबागे वरुडतालुक्यात संत्रा उत्पादकांवर चिंतेचे सावट पसरले आहे. आंबिया बहाराची संत्री आजही विक्रीच्या प्रतीक्षेत झाडावरच आहे. मात्र, झाडावरील संत्र्यावरसुध्दा किडींचा प्रादुर्भाव झाल्याने संत्र्याची मागणी घटली. आंबिया बहाराच्या संत्र्याचे आयुष्यमान संपल्याने त्यामध्ये किडींचा प्रादुर्भाव होऊन त्यावर अळ्या पडत आहेत.तालुक्यात मागिल ७० वर्षापासून संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. शेंदूरजनाघाट हे संत्र्याचे माहेरघर आहे. येथे शास्त्रीय पध्दतीने संत्रा कलमांचेसुध्दा मोठया प्रमाणात उत्पादन घेतले जाते. शेकडो हेक्टर जमिनीत संत्र्याची लागवड होऊन देश, विदेशात संत्रा निर्यात होऊ लागली होती. वरुडच्या संत्र्याची पाकिस्तान, बांग्लादेश, हॉलंड, दुबईसह अरब राष्ट्राने सुध्दा चव चाखली आहे. वरुड तालुक्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होऊ लागली होती. परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे यावर्षी संत्रा आंबिया बहाराची फळे आजही विक्रीच्या प्रतीक्षेत आहे. आंतरराज्यीय बाजारपेठेत भाव कोलमडल्याने याचा परिणाम शेतकऱ्यांवर झाला आहे. एकेकाळी संत्र्याला २० हजारांपासून तर ३५ हजार रुपयापर्यंत प्रतिटन भाव मिळत होता. यामुळे संत्रा उत्पादकांना फायदा मिळत होता. परंतु यावर्षी आंबिया बहाराचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले. मात्र, परप्रांतीय बाजारपेठेत भाव सुध्दा नसल्याने संत्र्याच्या दरात घसरण झाली. संत्रा तोडला नसल्याने व्यापाऱ्यांनासुध्दा लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. आजच्या घडीला ८ ते १० हजार रुपये प्रतीटनाचे दर आहेत.अनेकांना लाखोंचा संत्रा हजारात विकण्याची वेळ आली तर अनेक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला तर इसारादाखल दिलेली लाखो रुपयांची रक्कम शेतकऱ्याकडे पचली. आजही ३० ते ४० टक्के संत्रा झाडावरच आहे. यामुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. संत्र्याचे पुरेसे उत्पादन असले तरी भाव कमी असल्याने लाखो रुपयांचे नुकसान सोसण्याची वेळ संत्रा उत्पादकांवर आली. संत्र्याला मशागतीकरिता १२ ते १५ रुपये प्रति झाडाला खर्च येतो. परंतु दुष्काळी वर्षामध्ये उत्पादन खर्च काढणेही दुरापास्त झाल्याने संत्रा उत्पादकांवर चिंतेचे सावट पसरले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. परप्रांतिय बाजारपेठेत मागणी नाहीबहुगुणी संत्र्यापासून अनेक प्रकारच्या औषधी तर रस काढून बाटलीबंद रस विदेशातसुध्दा निर्यात करता येतो परंतु बहुगुणी संत्र्याचे मोठे उत्पादन होत असताना एकही कारखाना नसणे ही संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची शोकांतिका आहे. यावर्षी उत्पादन मोेठ्या प्रमाणात असल्याने संत्राची मागणी परप्रांतिय बाजारपेठेत कमी झाली. पंजाब, भूतानचा किन्नू, राजस्थानची संत्रा आल्याने विदभातील संत्राला मागणी नाही. यामुळे बेभाव विकला जाणारा संत्रा आता मातीमोल झाला. यामध्ये व्यापारी आणि शेतकरी चिंताग्रस्त झाले असून त्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.संत्र्याचे आयुष्यमान संपल्याने किडींचा प्रादुर्भाव आंबिया बहाराच्या संत्राचे आयुष्यमान संपल्याने संत्रा फळांवर किडींचा प्रादुर्भाव होऊन अळया पडत असल्याचे व्यापारी सांगतात. सुरूवातीला संत्र्याला चांगले भाव होते. मध्यतंरी संत्रा व्यापाऱ्यांनी खरेदीच बंद केली तर काहींनी विकत घेतलेल्या संत्राबागा सोडून पळ काढला. यामुळे कोट्यवधी रुपयांचा संत्रा झाडावरच राहिला. परंतु वातावरणातील बदल आणि वाढत्या तापमानामुळे संत्र्यामध्ये किडीचा प्रादुर्भाव होऊन अळया पडल्याने भाव मिळत असताना कोणीही खरेदीदार पुढे येत नाही. ही संत्री खाण्यास सुध्दा योग्य नसल्याने आता ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांना संत्रा उकिरडयात फेकण्याची वेळ आली आहे.
संत्रा बागांवर किडीचा प्रादुर्भाव
By admin | Published: January 14, 2016 12:12 AM