लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना संसर्ग उद्भवल्यानंतर पेट्रोल-डिझेलची दरवाढ हळूहळू वाढत जाणाऱ्या चंद्राच्या कलेप्रमाणे होत आहे. मात्र, त्यात एकदाही घट झालेली नाही. अमरावतीत मुंबईपेक्षा पेट्रोल महाग विकत घ्यावे लागत असल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत. इंधनाच्या दरवाढीबाबत असंतोष असला तरी त्यावर नियंत्रणाच्या मुद्द्यावर सत्तापक्षाच्या पुढाऱ्यांनी मौन बाळगल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. धारणी शहरातदेखील १०७.२४ रुपये लिटर दराने पेट्रोल विकले जात आहे.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती कमी असताना पेट्रोल पंपावर मात्र चढ्या दराने पेट्रोल-डिझेल विकत घ्यावे लागत आहे. केंद्र सरकारने अगदी अलीकडे २ जुलै २०२१ रोजी पेट्रोलवर प्रतिलिटर ३५ पैसे वाढविले होते. त्यामुळे रविवारी मुंबई येथे १०५ रुपये, तर अमरावती येथे पेट्रोल १०७.०३ रुपये प्रतिलिटर होते. राज्यात परभणी येथे १०७.८९ रुपये, तर त्यानंतर अमरावती येथे १०७.०३ रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोल घ्यावे लागत आहे. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावर रविवारी १०७.०३ रुपये लिटर याप्रमाणे पेट्रोल विकण्यात आले. स्पीड पेट्रोल १०९.९१ रुपये दराने विक्री सुरू आहे. डिझेलसाठी ९८.४० रुपये मोजावे लागत आहेत. धारणी शहरातसुद्धा १०७. २४ रुपये लिटर दराने पेट्रोल विकण्यात येत आहे. ‘एक देश - एक दर’चा नारा केंद्रात लावला जात असताना, मुंबईसारख्या आर्थिक राजधानी असलेल्या शहरात पेट्रोल दोन रुपयांनी स्वस्त आणि अमरावती येथे महाग कसे, असा सवाल सामान्यांनी उपस्थित केला आहे.
सर्वसामान्यांचे जगणं महागलंपेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्याने याचा परिणाम वाहतुकीच्या दरावर मोठा प्रमाणात झाला आहे. वाहतूक भाडे महागले असून आपसूकच जीवनावश्यक वस्तू, साहित्याचे दर गगनाला भिडले आहेत. इंधनाचे दर वाढताच मालवाहतुकीचे भाडे वाढले आहे. त्यामुळे अन्नधान्य, भाजीपाला, किराणा, खाद्यतेल चढ्या दराने विकत घ्यावे लागत आहे. पेट्रोल, डिझेल वाढीमुळे सर्वसामान्यांचे जगणे महागल्याचे चित्र आहे.
ईंधन दरवाढीचा नक्कीच सर्वसामान्याच्या जगण्यावर परिणाम झाला आहे. भाववाढीसाठी हे प्रमुख कारण आहे. अगोदर वाहनात १५०० रुपयांचे पेट्रोल भरल्यानंतर ते तीन दिवस चालायचे. आता दोन दिवसात पेट्रोल संपते.- कमलाकर पायस, ग्राहक
धारणीत पेट्रोलचे टॅंकर गायगाव डेपोतून अकोट, अंजनगाव, परतवाडा सेमाडोह मार्गे येत असून, हा प्रवास २०० किमीचा आहे. भाडे जास्त दराने लागत असल्याने पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली आहे.समीर पटेल, संचालक, भारत पेट्रोलियम धारणी