इंदल चव्हाणलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सर्व महागाईचे केंद्रबिंदू असलेले पेट्रोल, डिझेल ५ ते १२ रुपयांनी स्वस्त झाले. त्यामुळे भाजीपाला, धान्य व अन्य वस्तूंच्या किमतीही स्वस्त होण्याचे संकेत मिळत असल्याने सर्व सामान्यांना दिलासा मिळणार आहे. मनुष्य जीवनात दैनंदिन लागणाऱ्या बहुतांश वस्तू महाराष्ट्रात आयात करावी लागत असल्याने वाहतूक खर्चावर अन्य वस्तूंचे दर निर्भर राहतात. दिवाळीपूर्वी पेट्रोल ११७.४२ रुपये प्रतिलिटर आणि डिझेल १०८. २२ रुपये प्रतिलिटरवर पोहचले होते. त्यामुळे वाहतूक खर्च वाढल्याच्या नावावर अन्य वस्तूंचेदेखील दर भरमसाठ वाढविण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा चांगलाच फटका बसला. ही महागाई कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेलवरील आयात कर कमी केल्यामुळे आता पेट्रोल ५.८७ रुपयांनी, तर डिझेल १२.४८ रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्याचा परिणाम वाहतूक खर्च कमी झाल्यामुळे आता यापुढे जिल्ह्यात आयात होणाऱ्या वस्तूंची किंमत कमी होण्याची अपेक्षा सर्वसामान्यांना लागलेली आहे.
पेट्रोल ५.८७ रुपयांनी स्वस्तजिल्ह्यात दिवाळीपूर्वी पेट्रोल ११७.४२ रुपये प्रतिलिटर विक्री होत होते. शुक्रवारपासून पेट्रोल १११.५५ रुपयात विक्री होत आहे. आता पेट्रोल ५.८७ रुपयांनी स्वस्त झालेले आहे.
डिझेल १२.४८ रुपयांनी स्वस्तदिवाळीपूर्वी डिझेलचे दर १०८.२२ रुपये प्रतिलिटर होते. शुक्रवारपासून ते ९५.७४ रुपयावर आले आहे. त्यामुळे डिझेल १२.४८ रुपयांनी डिझेल आता स्वस्त झाले आहे.
महाग करण्याची घाई, स्वस्त कधी होणार?
गतवर्षी अतिपावसामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले. त्यामुळे आवक कमी झाल्याच्या नावावर सोयाबीनसह सर्वच तेलाचे दर कल्पनेपलीकडे गेले. यंदा सोयाबीनची आवक वाढली असताना बाजार सोयाबीनला भाव कमी आणि तेलाचे भाव तेच. त्यामुळे महाग करण्याची विक्रेत्यांना घाई होते. मात्र, स्वस्त करण्यासाठी शासनाची वाट पाहिली जाते. म्हणून आता पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाले असले तरी अन्य वस्तू, वाहतूक खर्च कमी कधी होणार याची वाट पहावी लागणार काय, असा प्रश्न जनतेतून होत आहे.