अमरावती : फोटोग्राफी करताना आशयपूर्ण फोटो क्लिक झाला पाहिजे. त्यातूनच फोटोग्राफरला सामाजिक कार्याची ओळख आणि प्रेरणा मिळते. फोटोग्राफी देखणी नव्हे तर बोलकी असावी, असे मत पद्मश्री तथा प्रसिद्ध फोटोग्राफर सुधारक ओलवे यांनी येथे बुधवारी व्यक्त केले.
अमरावतीच्या भीमटेकडी स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात फोटोग्राफी प्रमोशन ट्रस्ट आणि सेक्युलर आर्ट मुव्हमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फोटोग्राफी आॅन व्हील दरम्यान ओलवे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. फोटोग्राफीमुळे देश-विदेशात जाण्याची संधी मिळाली. मात्र, हल्ली फोटोग्राफरची डिजिटायझेशमुळे धावपळ वाढली आहे. फोटो दर्जेदार काढण्यापेक्षा तो अधिक संख्येने क्लिक केला जात आहे.
त्यामुळे फोटोग्राफीचा दर्जा घरसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. फोटोग्राफीचे जतन व्हावे; तो अमूल्य ठेवा आहे. फोटोचा दर्जा असला की, आपोआपच फोटोग्राफरचा दर्जा वाढतो, याचे भान छायाचित्रकारांनी ठेवावे, असे सुधारक ओलवे म्हणाले. फोटोग्राफी ही वर्तमानकाळातील असावी. भूतकाळातील छायाचित्रे हे ओळख देत नाही. सामाजिक आशय, मानवी आरोग्य, अत्याचार, भटकंती, कुपोषण, सामूहिक प्रश्न, शिक्षण, गरीबांच्या व्यथा अशा प्रकारची फोटोग्राफी केल्यास त्याला जगभरात मान्यता मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
फोटोग्राफी देखणी नव्हे तर बोलकी असावी, असा मौलीक सल्ला सुधारक ओलवे यांनी दिला. प्रेस फोटोग्राफर असोसिएशनतर्फे सुधाकर ओलवे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गौतमीपुत्र कांबळे, अविनाश सावजी, राजू पांडे आदी उपस्थित होते.