अमरावती : मुलाला उचलून मारणार तोच आई धावली अन् दीड वर्षाच्या मुलाचा जीव वाचला. अमरावतीच्या दर्शन विहार येथे ही घटना घडली. सोबतच त्या महिलेचा हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. याप्रकरणी आसेगाव पोलिसांनी २८ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून २२ नोव्हेंबर रोजी सारंग धंदर (४०) व लक्ष्मण धंदर (६०, दोन्ही रा. अमरावती) यांच्याविरुद्ध काैटुंबिक छळासह मारहाणीचा गुन्हा दाखल केला.
तक्रारकर्ती २८ वर्षीय महिला अमरावतीला राहते. पहिल्या पतीचे निधन झाल्याने तिचे सारंग धंदर याच्याशी दुसरे लग्न झाले. ती पहिल्या पतीपासून असलेल्या दीड वर्षीय मुलाला घेऊन सारंग धंदर याच्याकडे सासरी राहू लागली. त्यानंतर महिनाभरातच सारंगने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. पती व सासऱ्याने तिला माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावला. यादरम्यान ७ मे २०२२ रोजी सारंग हा मद्यपान करून घरी आला. तो तिच्या दीड वर्षीय मुलाला उचलून मारण्यासाठी घरून घेऊन गेला. मात्र, तो प्रकार लक्षात येताच तिने प्रतिकार करीत त्याला वाचविले. त्यानंतरही पैशांसाठी तगादा सुरूच राहिला. त्यामुळे महिलेने महिला सेलमध्ये धाव घेतली. मात्र, तेथे तोडगा निघू शकला नाही. अखेर ते प्रकरण गुन्हा दाखल करण्यासाठी आसेगाव पूर्णा पोलिस ठाण्यात पाठविण्यात आले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
५० हजार दिले नाहीस, तर मुलीला सोडून देईन
५० हजार रुपये दिले नाही, तर तुमच्या मुलीला सोडून देईन, अशी धमकी जावयाने सासऱ्याला दिली. ११ सप्टेंबर २०२२ ते २८ ऑगस्ट २०२३ दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी २५ वर्षीय विवाहितेच्या तक्रारीवरून मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी अविनाश मारोतराव भुजबळ (२८, रा. माठेगाव, जि. यवतमाळ) याच्याविरुद्ध २२ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी पतीने तिच्या अंगावरील सर्व दागदागिने काढून तिला जबरदस्तीने माहेरी आणून सोडले होते. २१ एप्रिल २०२२ रोजी लग्न झाल्यानंतर आरोपी पतीने तिला मारहाण सुरू केली.