परीक्षांपुरते प्रवेश :महाविद्यालये बंद, अभ्यासक्रम सुरू गणेश वासनिक ल्ल अमरावती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत चालविल्या जाणाऱ्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयांची पुरती वाट लागली आहे. ही महाविद्यालये केवळ कागदोपत्रीच असून ती परीक्षांपुरतीच सुरू असतात. मात्र, यागंभीर प्रकाराकडे विद्यापीठ प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. विद्यापीठाच्या नियंत्रणात सन १९९६-१९९७ पासून अमरावती जिल्ह्यात नऊ शारीरिक महाविद्यालयांना मान्यता प्रदान करण्यात आली आहे. यात अमरावती येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आणि श्री. शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, ही दोनच महाविद्यालये अनुदान तत्त्वावर सुरू आहेत तर सात महाविद्यालये विनाअनुदानित तत्त्वावर चालविली जातात. मात्र, शारीरिक शिक्षण महाविद्यालयाची प्रवेशप्रक्रिया केंद्रीय परीक्षा समितीकडून केली जात असल्याने यावर्षी प्रवेशाच्या टक्केवारीत कमालीची घट झाली आहे. विनाअनुदानित शारीरिक शिक्षण महाविद्यालयात प्रवेश नसल्यामुळे ती बंद पडली आहेत. काही महाविद्यालये शेवटच्या घटका मोजत असून यापूर्वीदेखील शारीरिक शिक्षण महाविद्यालये केवळ कागदोपत्रीच चालविली जात असल्याचे दिसून येते. इतकेच नव्हे तर विनाअनुदानित शारीरिक शिक्षण महाविद्यालये केवळ परप्रांतीय विद्यार्थ्यांसाठीच चालविली जात होती, हे प्रवेशाच्या यादीवरून स्पष्ट होते. यामहाविद्यालयांत प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांची केंद्रीय विद्यापीठ आयोगाच्या निकषानुसार भरती करण्यात आली नसल्याची माहिती आहे. संस्थाचालकांच्या मर्जीतील लोकांना अथवा नातेवाईकांनाच महाविद्यालयात रुजू करून घेण्यात आले आहे. शारीरिक शिक्षण महाविद्यालयांतील सावळागोंधळ हा १० वर्षांपासून असाच सुरू आहे. प्रवेशीत विद्यार्थी कोण, परीक्षा कोणी दिली, प्रात्यक्षिक कोणाचे, पदवी कोणाची, यासर्व बाबी धक्कादायक आहेत. संस्थाचालक विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाशी हातमिळवणी करून डिसेंबरपर्यंत प्रवेशप्रक्रिया सुरू ठेवत होते. त्यामुळे महाविद्यालयांचे अभ्यासक्रम केव्हा सुरू अन् केव्हा बंद होतात, हा संशोधनाचा विषय आहे. विनाअनुदानित शारीरिक शिक्षण महाविद्यालयांमध्ये यापूर्वी नियमबाह्य परप्रांतीय विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात असताना ते रोखण्याचे धारिष्ट्य विद्यापीठ प्रशासनाने केले नाही. विनाअनुदानित शारीरिक शिक्षण महाविद्यालयांना ५० प्रवेशक्षमता असताना यावर्षी प्रवेश नाहीत. काही महाविद्यालयांना कुलूप लागले आहे, तर काही महाविद्यालये बंद असूनही ते सुरू असल्याचे दर्शविले जात आहेत. विद्यापीठांतर्गत २९ महाविद्यालयांची हीच अवस्था आहे. (क्रमश:) महाविद्यालये आणि प्रवेश ४शहीद भगतसिंग शारीरिक शिक्षण महाविद्यालय कोंडेश्वर रोड (शून्य), स्व.दादाराव अडसड शारीरिक शिक्षण महाविद्यालय धामणगाव रेल्वे (२०), श्री.स्वामी समर्थ शारीरिक शिक्षण महाविद्यालय धामणगाव रेल्वे (शून्य), श्री.संत लहानुजी महाराज शारीरिक शिक्षण महाविद्यालय चांदूररेल्वे (१०), मनोरमाबाई देशमुख महाविद्यालय (बंद), युवाशक्ती शारीरिक शिक्षण महाविद्यालय मार्डी मार्ग (शून्य), गिरीजन शारीरिक शिक्षण महाविद्यालय चिखलदरा (१०) असे विद्यार्थी प्रवेशित आहेत. महाविद्यालये बंद असताना पदवी कशी ? ४विनाअनुदानित शारीरिक शिक्षण महाविद्यालये बंद असताना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून पदवी कशी दिली जाते, हा संशोधनाचा विषय आहे. विद्यार्थ्यांचे प्रवेश कागदोपत्रीच दर्शविले जात असताना विद्यापीठ प्रशासनाने यावर कधीच आक्षेप घेतला नाही. त्यामुळे शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमाची पदवी म्हणजे ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’, असा आजतागायत कारभार चालला आहे.
शारीरिक महाविद्यालये कागदोपत्रीच
By admin | Published: January 20, 2017 1:36 AM