खोडावर गाठी आल्याने झाडे वाकली : सोयाबीननंतर तूरही हातून जाणारलोकमत विशेषसुमित हरकूट चांदूरबाजारतालुक्यातील तूर पिकावर ‘फायटोप्थेरा ब्लाईट’ रोगाने आक्रमण केल्यामुळे हे पीकही अडचणीत आले आहे. सोयाबीन पाठोपाठ तूर पीकही हातून जाणार या धास्तीने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद व संत्रा या पिकांनी शेतकऱ्यांना पुरते गारद केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा या पिकावर केंद्रित झाल्या होत्या. परंतु या नवीन रोगामुळे शेतकऱ्यांचे स्वप्न धुसर झाले आहे.कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे आंतरपीक म्हणून शेतकरी वर्ग तुरीच्या पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी करतात. मुख्यत्वे करून सोयाबीनमध्ये तुरी आंतरपीक म्हणून तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवड केल्या जाते. बाजारात मागील वर्षीच्या तुरीला १४ हजार रूपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चालू खरीप हंगामातही या पिकाकडून खुप मोठ्या आशा निर्माण झाल्या होत्या. परंतु अशातच ‘फायटोप्थेराब्लाइट’ या रोगाने शेतकऱ्यांचा घात केला. या नवीन रोगामुळे तुरीच्या खोडावर जमिनी लगत गाठी येण्याचे प्रमाण यावर्षी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुरीचे जोमदार झाड गाठ असलेल्या ठिकाणापासून तुटून जमिनीवर कोलमडून पडत आहे. हा रोग तालुक्यातील तूर पिकाला संकटात आणत असून याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असल्याचे आढळून आले आहे. या रोगामुळे तुरीचे पीकही धोक्यात आल्यामुळे सोयाबीनने दगा दिल्यानंतर आशा टिकून असलेले तुरीचे पिकही हातून जाणार की काय, अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
‘फायटोप्थेरा ब्लाईट’मुळे तुरीचे पीक धोक्यात!
By admin | Published: November 21, 2015 12:09 AM