सहनिबंधकांकडे तक्रार : कार्यालय बनले भ्रष्टाचाराचा अड्डाअचलपूर : सतत वादाच्या भोवऱ्यात राहणारे सहदुय्यम निबंधक अर्जुन बडदे यांची बुलडाणा येथे बदली झाली असून त्यांच्या जागी मासूदकर आले आहेत. मागील तीन वर्षांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते मनीष लाडोळे यांनी एका प्लॉट विक्रीप्रकरणात सहदुय्यम निबंधक उखळकर यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला रंगेहात पकडून दिले. लाचखोर उखळकरांना अटक झाल्यानंतर येथील सहदुय्यम निबंधक पदावर अर्जुन बडदे यांची नियुक्ती करण्यात आली होती. बडदे हे येथे आल्यापासून वादग्रस्त राहिले. त्यांचे कार्यकाळात सहदुय्यम निबंधक कार्यालय भ्रष्टाचाराचा अड्डा झाला होता. त्यांचे विरोधात जिल्हा सहनिबंधक बटुले यांच्याकडे अनेक तक्रारी झाल्या. राज इंगळे आणि आशीष गवई या दोन वृत्तप्रतिनिधींना दिलेली अपमानास्पद वागणूक आणि पथ्रोट येथील एका नागरिकाला खरेदीसाठी दिलेला मानसिक त्रास हे दोन प्रकरणे सहदुय्यम निबंधक बडदे यांचे अंगलट आले. पत्रकारांना अपमानास्पद वागणूक दिल्याने सहदुय्यम निबंधक अर्जुन बडदे यांच्याविरुद्ध स्थानिक पत्रकार संतप्त झाले. त्यांनी वणवा पेटवायला सुरुवात केली. जिल्हाधिकारी, जिल्हा सदुय्यम निबंधक यांना लेखी निवेदने दिली. त्यात बडधे यांना पोलिसांनी अटक करून त्यांच्या कार्यकाळात झालेल्या खरेदी-विक्रीची चौकशी करावी, ते नोकरीवर लागल्यापासून त्यांच्या स्थावर मालमत्तेची चौकशी करावी, तसेच त्यांना तडकाफडकी निलंबित करावे इत्यादी मागण्या करण्यात येऊन ४ एप्रिलपासून उपोषणाचा इशाराही देण्यात आला होता. आंदोलन होऊ नये म्हणून २ एप्रिलपासून वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झाल्या. एकाएकी ३ रोजी हे आंदोलन स्थगित करण्यात आले. हे पेटलेले रान एकाएकी विझले कसे याबाबत चर्चेला ऊत आला. (शहर प्रतिनिधी)
अचलपूरच्या वादग्रस्त सहदुय्यम निबंधकाची उचलबांगडी
By admin | Published: June 13, 2016 1:25 AM