कार्बाईडचा अवैध वापर : अंजनगाव, पथ्रोट येथे रोज ५०० टन केळीचे उत्पादनअचलपूर/पथ्रोट अरूण पटोकारकेळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या पथ्रोट, अंजनगाव, पांढरी खानमपूर, जवळापूर परिसरात केळी उत्पादनाला घरघर लागली आहे. जिल्ह्याच्या बाजारात विक्रीसाठी येणारी केळी रासायनिक प्रक्रिया करून पिकविण्यात येत असल्याने अशा केळी आरोग्यासाठी घातक ठरू लागल्या आहेत. हिरवीकंच केळी ‘इथेनॉल’ या रासायनिक द्रव्याचा वापर करून पिकविण्यात येतात.केळी लावण्यापूर्वी शेतकरी जमिनीची मशागत करून शेतात शेणखत टाकणे, उच्च प्रतीची नवनवीन जातीची प्रमाणित टिश्यूकल्चर, श्रीमंती, आरु, महालक्ष्मी ही गावरानी बेणी १५ ते २० रुपये प्रति बेण्यानुसार विकत घेतात. ५ बाय ५ फूट अंतरावर जुलै ते आॅगस्ट महिन्यात केळीची लागवड केली जाते. साधारणत: एक एकरात १८०० झाडे लावली जातात. लागवडीचा, वाफे बांधणीचा, ऊखरी चाळणी, ड्रीप, स्प्रेर्इंग आणि २५ ते ३० पोते रासायनिक खताचा वापर केला जातो. यासाठी शेतकऱ्याला एकरी एक लाख रुपये खर्च येतो. पूर्वी खर्चाच्या मानाने केलेला दरही चांगला मिळत होता. त्यामुळे येथील शेतकरी केळी पिकाकडे वळला होता. मात्र, दोन वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, वाढते तापमान, घटलेला जलस्तर, लोडशेडिंग, खताचे वाढते दर, वाढती मजुरी व मुख्य म्हणजे उत्पादन खर्चाच्या मानाने केळीला मिळणारा अत्यल्प म्हणजे फक्त ४०० ते ५०० रूपये प्रतिक्विंटल त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा होत असल्यामुळे शेतकरी केळी पिकापासून दिवसेंदिवस लांब जात जात आहेत. या विपरित परिस्थितीमुळे या भागातील केळीच्या बागा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. उत्पादन खर्चाच्या मानाने केळीला कमीत कमी प्रति क्विंटल ९०० ते ११०० रुपयाचे दर मिळाले तर केळी पीक घेणे परवडेल, असे केळी बागायतदारांचे मत आहे. तीन वर्षापासून पथ्रोट-अंजनगाव सुर्जी येथे केळी पिकविण्याचे रायप्लिंग चेम्बर्स सुरू झाले. पथ्रोट येथे तीन, पांढरी खानमपूर येथे चार व अंजनगाव सुर्जी येथे दोन रायप्लिंग चेम्बर्स आहेत. या चेम्बर्समुळे शेतकऱ्यांना होणारा एक फायदा म्हणजे पूर्वी व्यापारी शेतकऱ्यांकडून दलाली व शेतातून घड काढण्याची मजुरी घेत होते. ते आता बंद झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक बचाव होऊन शेतकऱ्यांच्या मालाला बाराही महिने बाजारपेठ मिळते. पूर्वी उन्हाळ्यात केळीला बाजारभाव मिळत नव्हता व व्यापारी माल घेत नव्हते. आता तसे नाही. चेम्बर्समुळे व्यापाऱ्यांची सोय झाली आहे. आता शेतकरी त्यांचे मजूर व ट्रॅक्टर्स घेऊन शेतात जाऊन केळीचा माल काढतात, काढलेल्या मालाच्या फण्या करून त्या मोठ्या गंजामध्ये तुरटीच्या पाण्यात टाकून धुतल्या जातात. त्यानंतर त्या कॅरेटमध्ये भरून चार दिवसपर्यंत चेम्बर्समध्ये ठेवल्या जातात व पाचव्या दिवशी त्या फण्यांवर इथेनॉलची फवारणी करण्याची प्रक्रिया केली जाते. यानंतर तीन दिवसांनी केळी पिवळी (पिकेपर्यंत) होईपर्यंत वातानुकुलित चेम्बर्समध्येच ठेवून चौथ्या दिवशी ती बाजारात पाठविली जातात. येथील केळी नागपूर, भोपाळ, इटारसी, बल्लारशा, वरोरा, आमला, शिवनी आदी ठिकाणी जातात. सुमारे ५०० टन पिकलेला माल दरदिवसाला येथून पाठविला जातो.
पिकविलेली केळी घातक
By admin | Published: April 19, 2016 12:12 AM