अमरावती : जिल्हा परिषदेतील सेवेची ५ वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचे कार्यालय बदल व एकाच टेबलावर तीन वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांच्या टेबलबदलीचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडे सादर होता. अखेर या प्रस्तावावर सीईओंनी शिक्कामोर्तब केले आहे. जारी केलेले विभाग व टेबलबदलाच्या प्रस्तावानुसार विविध विभागांतील २० कर्मचाऱ्यांचे विभाग तर ३८ कर्मचाऱ्यांचे टेबल बदलविण्यात आले आहे. अशाप्रकारे ५८ जणांचा यात समावेश आहे.
जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना एकाच विभागात सलग पाच वर्षे ठाण मांडून बसलेल्या आणि एकाच टेबलावर सलग तीन वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या विभाग व टेबलबदलीचा प्रस्ताव गत १५ दिवसांपूर्वी सादर केला होता. या प्रस्तावावर सीईओ अविश्यांत पंडा यांनी २५ जुलै रोजी शिक्कामोर्तब केले आहे. यामध्ये सामान्य प्रशासन, शिक्षण, पाणीपुरवठा, पशुसंवर्धन, बांधकाम, जलसंधारण या विभागातील २० कर्मचाऱ्यांचे विभाग बदलविण्यात आले आहेत. सामान्य प्रशासन विभागातील ५ आणि वित्त विभागातील २२, प्राथमिक शिक्षण विभागातील ८ अशा ३८ कर्मचाऱ्यांचे टेबल बदलविण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेतील काही विभागात सलग पाच वर्षापासून कार्यरत असलेल्या तसेच एकाच टेबलावर तीन वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विभाग व टेबल बदलविण्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने प्रस्ताव सादर केला होता.सदरचा प्रस्ताव मंजूर करून अंमलबजावणीचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत, असे अविश्यांत पंडा यांनी सांगितले.