पोलिसांना गुंगारा देताना सुटले चालकाचे नियंत्रण, १२ गोवंशासह चार लाखांचा मुद्देमाल जप्त
बेनोडा (शहीद) : स्थानिक बेनोडा येथे शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास अवैध गोवंश वाहतूक करणारे पिकअप वाहन पोलिसांना गुंगारा देण्याच्या प्रयत्नात उलटले. त्यात कोंबलेल्या बारा गोवंशाला दुखापती झाली. याप्रकरणी १२ गोवंशासह चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बेनोड्याचे ठाणेदार मिलिंद सरकटे यांनी गोपनीय माहितीवरून बसस्थानक परिसरात नाकेबंदी लावली होती. संशयित वाहन येताच पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने आपले वाहन न थांबवता मोर्शीच्या दिशेने भरधाव पळविले. यात त्याचा पिकअप वाहनावरील ताबा सुटल्याने ते थोड्या अंतरावर उलटले. वाहन उलटताच वाहनचालक व त्याचा साथीदार पसार झाले. वाहनात कत्तलीसाठी निर्दयपणे कोंबलेल्या अनेक गाईंना दुखापत झाली. पोलिसांनी गोरक्षकांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी पाठविले.
सदर अनोळखी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तीन लाख रुपयांचे पिकअप वाहन (एमएच ०५ बीएच ५९२४), दहा हजारांचे मोबाईल, ५९ हजारांचे १२ गोवंश असा एकूण ३ लक्ष ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. घटनेचा पुढील तपास ठाणेदार मिलिंद सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली बेनोडा पोलीस करीत आहेत.