अमरावती : सर्व मुलांना समान गुणवत्तापूर्ण सर्वोच्च दर्जाचे शिक्षण मिळावे तसेच त्यांच्यामध्ये २१ व्या शतकातील कौशल्ये विकसित करण्यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे. यानुसार जिल्ह्यातील २७ जिल्हा परिषदेच्या शाळांचा कायापालट होणार आहे.
पाठ्यपुस्तकाच्या मर्यादेपलीकडे जाऊन शिकणे आणि शिकविणे या दोन्ही क्रिया घडाव्यात, शिक्षणाच्या प्रती समाज सक्रिय व्हावा या उद्देशाने सोबतच शाळांप्रती पालकांचा विश्वास वाढावा याकरिता शासनाने पुढाकार घेताला आहे. राज्यासह जिल्ह्यातील शासकीय शाळांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनामार्फत आदर्श शाळांची निर्मिती केली जाणार आहे. शासन निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात निवड करण्यात आलेल्या ४८८ शाळांपैकी जिल्ह्यातील २७ शाळांना विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध होणार आहे. .
बाॅक्स
या निकषानुसार शाळांची निवड
मुलांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवून देण्यासाठी राज्यशासनाने आदर्श शाळा योजनेअंतर्गत विशिष्ट निकषांच्या आधारे शाळांची निवड केली आहे. यामध्ये वाढता लोक सहभाग, भविष्यात वाढती पटसंख्या व किमान १०० रे १५० पटसंख्या, शालेय प्रांगणात अंगणवाडी (पूर्व प्राथमिक वर्ग) उपलब्धी, आकर्षक शाळा इमारत, विद्यार्थीसंख्येनुसार वर्ग खोल्या, मुला-मुलींकरीता आणि सीडब्ल्यूएसएन साठी स्वतंत्र व पुरेशी स्वच्छतागृहे, पेयजल सुविधा व हँडवॉश स्टेशन, मध्यान्ह भोजनाकरिता स्वयंपाकगृह यासारख्या निकषांचा यात समावेश आहे.
बॉक्स
असा होईल विकास
आदर्श शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या दृष्टीने सुसज्ज भौतिक सुविधांची उपलब्धी, वर्गखोल्या, संगणकीकरण, शाळा दुरुस्ती, शैक्षणिक साहित्य इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या निधीचा विनियोग करण्यात येणार आहे. या शाळांचा विविध स्तरावर विकास केला जाणार आहे.
बॉक्स
जिल्ह्यातील या आहेत शाळा
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नांदूरा बु, नेरपिंगळाई, येवदा, हरम, मार्डी, पांढरी खानापूर, मनपा शाळा क्र २, खिडकीकलम, ताेंडगाव, बेलोरा चांदूर बाजार, विसोळी, घाटलाडकी, देऊरवाडा, राजनापूर्णा, शिजरगांव बंड, ब्राम्हणवाडा थडी, शिरजगांव कसबा मराठी व उर्दू शाळा, शिवनी रसुलापूर, गांगरखेडा,शासकीय विद्यानिकेतन मनपा, बेनोडा, टाकरखेड संभू, जळका जगताप आणि अंजनसिंगी अशा २७ शाळांचा कायापालट होणार आहे.