अमरावती- अमरावतीवरून मोर्शीकडे ३२ किलोमीटर आणि मोर्शीवरून अमरावतीकडे २३ किलोमीटर अंतरावर गोराळा या स्टॉपपासून पूर्वेला एक किलोमीटर अंतरावर सुंदरगिरी नावाच्या उंच व रूंद अशा निसर्गरम्य टेकडीवर पिंगळादेवीचे ऐतिहासिक भव्य असे मंदिर आहे. मानवाची सारी दु:खे हिरावून घेणारं हे निसर्गरम्य स्थळ आहे, यालाच पिंगळादेवी गड असे म्हणतात. हा गड म्हणजे नेरपिंगळाई, नांदुरा पिंगळाई व सावरखेड पिंगळाई या तीन गावाची सीमारेषा. परंतु मुख्य म्हणजे नांदुऱ्याच्या सिमेत समाविष्ट आहे. देवीच्या मूर्तीचे धड जमिनीच्या आत व शीर वर आहे. पूर्वाभिमुख मातेचा मोहक चेहरा, तेजस्वी डोळे, उंच कपाळ, प्रदेश्यानवर व मधोमध चंद्रकोर व कुमकुम टिळक डोक्यावर वस्त्र परिधान केले असून त्यांचे रूप डोळे दिपविणारे आहे. देवीला दिवसातून तीन वेळा रूप बदलते.
सकाळी बाल, दुपारी तरूण आणि संध्याकाळी वृद्ध दिसते. हे दृष्य मोठे विलोभनीय वाटते. देवीचे मंदिराचा व सभोवतालचा गाभारा हा हेमाडपंथी बांधणीचा असल्यामुळे या मंदिराची स्थापना जवळजवळ पाचशे वर्षापूर्वी झाली असावी असे सांगण्यात येते. पूर्वी मंदिराचा सभामंडप लाकडी होता. निजामशाहीमध्ये नवाबाने काढून नेला त्यामुळे देवीचा कोप झाला. राजाचे पोट खुप दुखु लागले. पुजाऱ्याने देवीचा अंगारा लावला, क्षणिच वेदना थांबल्यामुळे त्याची देवीवर श्रद्धा जडली. त्याने पुन्हा सभामंडप बांधून दिला अशी दंतकथा आहे.
जवळजवळ वीस वर्षापूर्वी नवरात्रात एक चमत्कारिक घटना घडली. पाऊस सुरू असताना मंदिरात भजन-पुजन सुरू होते. यावेळी अचानक आकाशातून वीज कडाडली व मंदिराच्या कळसावर पडली. आश्चर्य असे की कुणालाच ईजा झाली नाही. देवीच्या अंगावरील पितांबर जळून भस्म झाले व तटाला थोडे भगदाड पडले. ते भगदाड गेल्या पिढीतील पुजारी स्व. नांदुरकर काकाजी यांनी वर्गणी गोळा करून बुजविले.
प्रवेशद्वारालगतच एक दिपस्तंभासारखा स्तंभ आहे. त्याला ‘निग्रेशिक सर्वे स्टँड’ म्हणतात. येथून दुरदुरच्या प्रदेशाचा सर्वे करतात. चैत्र पौर्णिमेला आणि नवरात्रात येथे देवीची यात्रा भरते. श्रावण महिन्यात सुद्धा भक्तप्रेमी वजा निसर्गप्रेमी आनंद लुटतात. पावसाच्या कोसळणाºया सरी, ढगांची धावपळ, गुºह्यांचे हंबरणे, गुराख्यांची मधूर गाणी, शेतीत मग्न झालेले शेतकरी उन-पावसाचा खेळ निवांत बसलेली गावे हे सारे विलभोनिय वाटते.
मंदिरापासून १०० मीटर एक तलाव आहे. हा तलाव भोसले राजानी बांधला होता. याला कापूर तलाव म्हणतात. यावर्षी विश्वस्त मंडळाने शासकीय अधिकाऱ्यांना विनंती करून तलावाची दुरूस्ती, गाळ काढणे व सभोवतालच्या भिंती बांधून घेतल्या. तलावाला लागून संत नागेश्वर महाराजांची समाधी आहे. त्यांच्या अंगावर नेहमी साप खेळत असे. बाजूला शिरखेडचे वामन महाराज आणि आता देवीचे पुजारी स्व. नांदुरकर काकाजी यांची समाधी आहे. भक्तगणापैकी मोठमोठ्या दानसुरांना तसेच शासकीय खात्याच्या छोट्या मोठ्या अधिकाºयांना व या गावातील पुढारी लोकांना त्यांच्यासमोर आपल्या संस्थेच्या समस्या सांगून त्या दूर करण्यात यश मिळवितात. यातूनच संस्थेची विकासाकडे वाटचाल चालू आहे. येथे येणाऱ्या भाविकांसाठी शासनाने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. वीज व दुरध्वनीची सुविधा येथे करण्यात आली आहे. मंदिराचे समोर भव्य असे भक्तनिवास, सांस्कृतिक भवन बांधण्यात आले आहे. त्यामुळे येथे वर्षाकाठी ५०-६० लग्न येथे लावल्या जातात. हा परिसर निसर्गरम्य असून हे मंदिर म्हणजे अमरावती व मोर्शी या दोन तालुक्याच्या तसेच अमरावती व मोर्शी या लोकसभा मतदारसंघाच्या सिमेवर असल्यामुळे निवडुणकीच्या वेळी लहानमोठे उमेदवार येथे प्रचाराचा नारळ फोडतात व आपल्या विजयासाठी देवीजवळ प्रार्थना करतात. निवडून आल्यावर मतदारांना जेवणही याच गडावर देतात, परंतु हे महारथी येऊनही बघत नाहीत. तसेच नवरात्र काळात या ठिकाणी लाखो भक्तांचा दर्शनासाठी नऊ दिवसात जनसागर उसळतो.
नवरात्रात नऊ दिवस येथे अमरावती जिल्ह्यातून भक्तजन अनवानी पायानी पायदळ येवून सकाळी पाच वाजता पिंगळामातेच्या दर्शनाचा लाभ हजारो भक्तजन घेतात. या समान दररोज प्रार्थना, हरिपाठ, भजने, कीर्तने, गोंधळ असतात. भक्ताकरिता अमरावती-मोर्शी परिवहन मंडळाने बसेसची व्यवस्था केली आहे. तरी एकदा या निसर्गरम्य स्थळी पिंगळामातेच्या दर्शनाला यावे.