अमरावती : पावसाळा संपल्यानंतर थंडीची चाहुल लागते. मात्र, अद्यापपर्यंत पाहिजे तशी थंडी पडलेली नाही. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा थंडीची लाट १५ दिवस उशिरा आली असून २१ डिसेंबरनंतर गुलाबी थंडीचा आनंद अमरावतीकरांना घेता येणार आहे.दरवर्षी आॅक्टोबरच्या शेवटी थंडी जाणवते, मात्र, यंदा आॅक्टोबर व नोव्हेंबर गेला तरीही थंडी जाणवली नाही. डिसेंबरच्या सुरुवातीपासून हळूहळू थंडी वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांच्या मते, सोमवार ते रविवारपर्यंत कमाल तापमान ३० ते ३१ व किमान तापमान १३ ते १७ डिग्री सेल्सिअसपर्यंत राहण्याचे संकेत आहे. दरम्यान वाऱ्याचा वेग ५ ते ७ किलोमीटर प्रतितास राहणार आहे. गुरुवारपासून आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असून रात्रीच्या तापमानात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात रात्रीचे तापमान १२ ते १५ डिग्री सेल्सिअसदरम्यान राहील. यादरम्यान गुलाबी थंडीचा आनंद अमरावतीकरांना घेता येणार आहे. त्यानंतर बोचरी थंडीला सुरुवात होण्याचे संकेत आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा थंडी १५ दिवसा उशिरा आली आहे. आतापर्यंत थंडीचा प्रभाव नव्हता, मात्र, आता थंडी हळूहळू वाढत आहे. मागील वर्र्षी डिसेंबरमध्ये ७.५ ते १४ डिग्री सेल्सिअस तापमान होते. मात्र, यंदा ते १२ ते १७ डिग्रीदरम्यान आहे. यंदा थंडी कमी राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांचा आहे. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांनी घ्यावी काळजीशेतीतज्ज्ञांच्या मते, ढगाळ वातावरण राहिल्यास हरभरा आणि तुरीच्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. अशा वातावरणात कृषितज्ज्ञांच्या मार्गदर्शनात तत्काळ फवारणी करावी. संत्रावर पांढरी माशी आणि कोळशीचा प्रकोप होऊ शकतो.ग्रामीण भागात पेटल्या शेकट्याथंडीचा प्रभाव शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अधिक प्रमाणात जाणवतो. ओलीत शेती व मोकळा भाग असल्यामुळे थंड वारे वाहतात. त्यामुळे थंडीचा प्रकोप अधिक असतो. सद्यस्थितीत ग्रामीण भागातील नागरिक शेकट्या पेटवून गप्पा करताना आढळून येत आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा थंडी उशिरा आली आहे. सोमवार ते रविवार रात्रीच्या तापमानात थोडी वाढ होणार असून डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यानंतर थंडी वाढणार आहे. म्हणजेच गुलाबी थंडी पडणार आहे. यादरम्यान ढगाळ वातावरण राहिल्यास शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी. - अनिल बंड, हवामान तज्ज्ञ, श्री शिवाजी कृषि महाविद्यालय. अमरावती.
डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यानंतर 'गुलाबी थंडी'
By admin | Published: December 07, 2015 4:40 AM