(फोटो आहे.)
अमरावती : आरटीओ कार्यालयात कामानिमित्त येणारे तसेच धूम्रपान करणारे नागरिक भिंतीवर पिचकाऱ्या मारून भिंती लाल करीत असल्याचे वास्तव आहे. कोरोना काळात नागरिक व कर्मचारी पिचकाऱ्या मारीत असतील तर त्यांच्यावर वॉच ठेवून कारवाई अपेक्षित आहे.
या ठिकाणी आरटीओ तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्या कार्यालयात बसतात त्या इमारतीजवळ कोपऱ्यातील भिंती येथे कामानिमित्त येणाऱ्यांनी लाल केल्या आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या सभ्य नागरिकांना हा प्रकार किळसवाणा वाटतो. येथे नेहमी स्वच्छता होत नसल्याने भिंती नेहमीच लाल राहतात. त्यामुळे याचा परिणाम म्हणून इतरांचे आरोग्यसुद्धा धोक्यात आले आहे. येथे नेहमी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच असतो. त्यामुळे धूम्रपान करणाऱ्या नागरिकांवर तसेच कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी होत आहे. तसेच लाल झालेल्या भिंतीला चुना मारून या ठिकाणी पुन्हा कुणी पान, पुडी, खऱ्या खावून पिचकाऱ्या मारणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी होत आहे.