नगरपंचायतकडे लक्ष : लिलावप्रक्रिया राबविण्याची मागणी
धारणी : येथील बहुचर्चित सर्वे नंबर १२६ अर्थात गुजरी बाजार येथे बाजार ओट्यांचे काम पूर्ण झाले आहे. विशेषत: भाजीपाला विक्रेत्यांना या दुकानांचा सर्वात प्रथम वाटप करण्यात येणार आहे. त्यात गरिब भाजीविक्रेत्यांना सामावून घ्यावे; लब्धप्रतिष्ठितांनी त्या जागा पुन्हा बळकावू नये म्हणून नगरपंचायत प्रशासनाने लिलाव पद्धती अवलंबवावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
शहरात जवळपास आठ ते दहा मोठे भाजीपाला विक्रेते आहेत. स्वत:च्या शेतातील भाजीपाला विकण्यासाठी आदिवासी भगिनीदेखील शहरात मोठ्या प्रमाणात दाखल होतात. त्यांची संख्या २५ ते ३० च्या घरात आहे. मात्र, दुर्दैव असे की, या आदिवासी भगिनींना दुकाने लावण्यासाठी जागा उपलब्ध होत नाहीत. सर्वे नंबर १२६ लगत असलेल्या घरांसमोर घरमालकांच्या दयेवर त्यांना दुकान लावावे लागते. आता सर्वे नंबर १२६ मध्ये दुकाने पूर्णत्वास आल्यानंतर अवघ्या काही दिवसांत या दुकानांचे भाजीपाला विक्रेत्यांना हस्तांतरण होणार आहे. त्यासाठी नियमाप्रमाणे प्रक्रिया करण्यात येणार आहे. यात गरीब आदिवासी बांधवांना न्याय मिळणार काय, यात साशंकता आहे. कारण गर्भश्रीमंतांना पाहिजे त्या प्रमाणात मोठी जागा उपलब्ध करून देण्यात नगरपंचायत पटाईत आहे, असे आक्षेप व्यक्त होत आहेत.
----------