आढावा बैठक : सुनील देशमुखांकडून अधिकाऱ्यांना सूचनालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात सुरू असलेले अंतर्गत काँक्रिटिकरणाचे रस्ते, भुयारी गटार योेजना व जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईन व इतर कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश आमदार सुनील देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका व जीवन प्राधिकरण, वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालय सभागृहात शहरातील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. येथील रेल्वे स्टेशन ते इर्विन चौक रस्त्याचे काम सुुरू असल्यामुळे वाहतूक वनवे करण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडीचा प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभाग व शहर वाहतूक पोलिसांनी समन्वयाने सोडवावा, असे निर्देशही आ. देशमुख यांनी यावेळी दिले. अमरावती आगार ते रेल्वेस्टेशन चौकपर्यंत रस्त्याचे कामे सुरू करण्यात आलेले आहे. पण उस्माना मशिद जवळ खापर्डे बगीच्याकडून येणारा रस्ता टिनाचे पत्रे लावून अडविण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक बंद झाली आहे. तसेच शाळा सुरू झाल्या आहेत. हॉलीक्रॉस कॉन्व्हेंट ते समाधान नगरकडे जाणाऱ्या रस्त्यांचे काम सुरू आहे. शाळा सुटल्यानंतर या ठिकाणी स्कूल व्हॅन व आॅटो उभे राहतात. त्यामुळे इर्विन चौक ते कॅम्पकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा मुद्दाही चर्चेला गेला. शाळा सुटते तेव्हा नेमके या ठिकाणी वाहतूक पोलिस तैनात नसतात त्यामुळे येथे अतिरिक्त वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात यावा, असे वाहतूक शाखेचे निरीक्षक अर्जुन ठोसरे यांना आ. देशमुखांनी सांगितले. यावेळी रूख्मिणीनगर तसेच राजकमल ते गांधी चौककडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामासंदर्भातही चर्चा झाली. अमरावती आगार ते मालटेकडीकडे जाणारा रस्ता करताना कुठलेही वृक्ष तोडण्यात येऊ नये, यासंदर्भाची खबरदारी घ्यावी लागेल. यावरही चर्चा करण्यात आली. तसेच पठाण चौकातील पाईपलाईन व शहरातील रस्ते करताना या ठिकाणी जे वाहतुकीची कोंडी होत आहे. ज्या ठिकाणी वनवे आहे, त्याठिकाणी जडवाहनांना प्रवेशबंदी द्यावी व वाहतूक पोलिसांनी यासंदर्भात कडक अंमलबजावणी करावी, असे निर्देशही यावेळी आमदार सुनील देशमुख यांनी बैठकीतील संबधित अधिकाऱ्यांना दिलेत. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक साळवे, कार्यकारी अभियंता संतोष जाधव, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता सुहास मेहेत्रे, कार्यकारी अभियंता दिलीप मोहोड, महापालिकेचे शहर अभियंता जीवन सदार, मजीप्राचे उपअभियंता सतीश बक्षी, शाखा अभियंता मसकरे, भुयारी गटार योजनेचे उपअभियंता गजभिये, तसेच सर्व विभागाच्या उपअभियंता शाखा अभियंता व ज्यांना शहराच्या विकासाची कामे मिळाली आहेत. ते संबंधित कॉन्ट्रॅक्टर या बैठकीला उपस्थित होते. अपघात झाल्यास पोलीस जबाबदार शहरातील शाळा सुरू झाल्या आहेत. शाळा सुटल्यानंतर हजारो विद्यार्थी रस्त्यावर असतात. शहरातील अंतर्गत रस्त्यांचे विकासात्मक कामे सुुरू असल्याने वाहतुक वनवे करण्यात आलेली आहे. वाहतुकीची कोंडी झाल्यास ते सुरळीत करण्याचे कामे पोलिसांचे आहे. पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी वाहतुकीची अडचण दूर करावी, असे आ.सुनील देशमुख म्हणाले.
रस्ते निर्मितीचे नियोजन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2017 12:20 AM