अमरावती : फ्रेजरपुरा ठाणे हद्दीतील राजुरा येथील पारधी बेड्यावर एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा नियोजित विवाह बुधवारी सकाळी पार पडणार असल्याची माहिती फोनवरून हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या चाईल्ड लाईन’ला मिळाली. त्यानंतर चाईल्ड लाईनचे पदाधिकारी व फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला. त्यानंतर मुलगासुद्धा २० वर्षीय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मुलाचे विवाहाचे वय हे २१ वर्षीय असल्याने तोसुद्धा अल्पवयीन मानला जात आहे. त्यामुळे दोघांचाही विवाह रोखण्यात आला. मुला-मुलीच्या परिवाराने दोघांचेही वय विवाहास योग्य असल्याचे सांगून पोलिसांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी व चाईल्ड लाईनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढली.
यावेळी पारधी बेड्यावरील नागरिकांची गर्दी झाली होती. मुला-मुलीला चाईल्ड लाईनच्या ताब्यात देण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम, पोलीस निरीक्षक नितीन मगर, एपीआय सोनाली मेश्राम, महिला पोलीस नाईक वैशाली सुर्जेकर तसेच हव्याम प्रसारक मंडळ चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक शंकर बी. वाघमारे, जिल्हा बालसंरक्षक अधिकारी अजय डबले, पंकज शिंगारे यांच्यासह पोलीस पाटील हनुमान शेळके, अंगणवाडी सेविका पवार व मानकर उपस्थित होत्या.