पोलीस स्टेशन मधील डॉ. अब्दुल कलाम अभ्यासिकेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
चांदूर रेल्वे : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना पुस्तक वाचनासोबत अभ्यासाचे नियोजनही तेवढेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ठाणेदार मगन मेहते यांनी केले. ते स्थानिक पोलीस ठाण्यातील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अभ्यासिकेत रविवारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना गावातच अभ्यासिका उपलब्ध व्हावी, या दृष्टीने ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. हरिबालाजी एन. यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावरील पोलीस ठाण्यात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने अभ्यासिका सुरू केली असून, याला चांदूर रेल्वेमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच ठाणेदार मगन मेहते यांनी या अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना रविवारी मार्गदर्शन केले. यावेळी हे.काँ. शिवाजी घुगे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पोलीस ठाण्यातील अभ्यासिकेतील विद्यार्थी उपस्थित होते.