अमरावती : कोरोना काळात ऑक्सिजनचे काय महत्त्व असते, हे लक्षात आले आहे. त्यामुळे येत्या पसावळ्यात महापालिका उद्त्नान्यात ऑक्सिजन उत्सर्जित करणाऱ्या वृक्षांची लागवड करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी महापौर किशोर शेळके यांनी केली आहे. महापालिका आयुक्त प्रशांत राेडे यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले आहे.
महापालिका क्षेत्रात प्रत्येक प्रभागात दोन किंवा तीन उद्याने आहेत. मात्र, या उद्यानात ऑक्सिजन उत्सर्जित करणाऱ्या वृक्षांची संख्या कमी आहे. उद्यानांची देखभाल, संरक्षणासाठी कंत्राटदार अथवा कर्मचारी नियुक्ती आहेत. कोरोना काळात रुग्णांना ऑक्सिजनअभावी प्राण गमवावे लागले. ही बाब लक्षात घेता ऑक्सिजन उत्सर्जित करणाऱ्या वृक्षांची लागवड करणे काळाची गरज आहे. शहरात रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली. मात्र, यात ऑक्सिजन उत्सर्जित करणाऱ्या वृक्षांची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामध्ये महापालिका प्रशासनाने कडूलिंब, कदंब, पिंपळ या झाडांचा समावेश नाही. यापुढे ऑक्सिजन उत्सर्जित करणाऱ्या वृक्षांची लागवड करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे झाले आहे, असे माजी महापौर शेळके यांनी निवेदनात म्हटले आहे. किमान पाच ते १० झाडे ऑक्सिजन उत्सर्जित करणाऱ्या वृक्षांची लागवड करावी, अशी मागणी आहे.