लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : सुबोध हायस्कूलमध्ये रंगाच्या टाकाऊ प्लास्टिक बकेटीत शोभिवंत झाडे उगवण्यात आली आहेत. यामुळे शाळेच्या सौंदर्यात भर पडली तसेच प्लास्टिकचा खच कमी झाला आहे.सुबोध हायस्कूलच्या इमारतीला यावर्षी रंगरंगोटी केली गेली. यात रंगाच्या ९२ बकेट शाळेला लागल्या. या रिकाम्या झालेल्या बकेटा मागणाऱ्यांची संख्या वाढली. विकायला काढल्या, तर पाच ते दहा रुपयांहून अधिक द्यायला कुणी तयार नव्हते. दुसरीकडे झाडे लावायला कुंड्या विकत आणायच्या, तर दीडशे-दोनशे रुपयांना एकेक कुंडी. यावर शाळेतील उपक्रमशील शिक्षिका वीणा भारतीय यांनी त्यावर तोडगा काढला. या बकेटांमध्ये वृक्षारोपण करून त्या वर्गासमोर व्हरांड्यात ठेवण्याचा उपक्रम त्यांनी सुचविला. उपक्रमाला शाळेतील शिक्षकांसह संस्थेनेही प्रतिसाद दिला. या बकेटांना खालून छिद्र पाडून त्यात काळी माती भरली गेली. माती भरलेल्या बकेटा वर्गांपुढे व्हरांड्यात ठेवल्या गेल्यात. यात शोभेची झाडे लावण्याकरिता अमरावतीवरून रोपे मागवल्या गेलीत. एकूण ९२ बकेटांमध्ये ही शोभेची झाडे बहरली आहेत. प्रत्येक वर्गासमोरील या झाडांची, बकेटांची जबाबदारी त्या-त्या वर्गातील विद्यार्थ्यांवर सोपविण्यात आली आहे.शाळा सुटल्यानंतर घरी परत जाताना वॉटर बॅगमधील शिल्लक पाणी बाहेर न फेकता या झाडांना टाकण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना दिल्या गेल्यात. यात विद्यार्थ्यांनी त्या झाडांची जबाबदारी स्वीकारली असून, त्यांच्या वॉटर बॅगमधील शिल्लक पाण्यावर ती झाडे जगवल्या जात आहेत.बकेटीतील या हिरव्याकंच झाडांमुळे शालेय वातावरणाला एक वेगळाच पर्यावरणपूरक रंग चढला आहे. संस्थेचे सचिव डॉ. अनंद भारतीय यांच्या मार्गदर्शनात मुख्याध्यापक सदाशिव ढोरे, पर्यवेक्षक संजय चौबे, उपक्रमशील शिक्षिका वीणा भारतीय यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी या उपक्रमाला जपत आहेत. हा असा उपक्रम राबविणारी ही पहिलीच शाळा ठरली आहे. निव्वळ एकाच शाळेने नव्हे, तर जिल्हाभरातील शाळांनी हा उपक्रम राबवावा, अशी अपेक्षा शाळा प्रशासनाने व्यक्त केली.