महिला, बाल कल्याण मंत्र्यांच्या पुढाकार, ब्रँड विकसित होण्यासाठी संशोधन, नियोजनावर भर
अमरावती : मेळघाटातील आदिवासी महिला भगिनींच्या बचत गटांद्वारे उत्पादित वस्तूंच्या विक्री व विपणनासाठी 'मेळघाट हाट'चा प्लॅटफॉर्म निर्माण करण्यात येत आहे. या वस्तूंचा ब्रँड विकसित होण्यासाठी अधिक संशोधन व परिपूर्ण नियोजन करावे. या उपक्रमातून मेळघाटातील भगिनींना कायमस्वरूपी रोजगार मिळावा व 'मेळघाट हाट'ची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सोमवारी येथे दिले.
ना. ठाकूर यांच्या संकल्पनेतून महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आदिवासी महिला बचत गटाच्या उत्पादनांच्या विपणनासाठी 'मेळघाट हाट' प्रकल्प आकारास येत आहे. त्याअनुषंगाने नियोजित प्रकल्पाबाबत सादरीकरण व चर्चेसाठी ना. ठाकूर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मिताली सेठी आदी याप्रसंगी उपस्थित होते. 'माविम'चे जिल्हा समन्वयक सुनील सोसे यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले. ना. ठाकूर म्हणाल्या की, मेळघाटात स्थानिक महिला भगिनींना रोजगार मिळवून देण्यासाठी बचत गटांचे जाळे निर्माण करण्यात आले. या भगिनींकडून अनेक उत्कृष्ट उत्पादने तयार होतात. त्यात विविधता आणणे, या नैसर्गिक उत्पादनांची वैशिष्ट्ये जगापुढे आणणे व विपणनाचे जाळे भक्कम करणे यासाठी 'मेळघाट हाट'चा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल.
---------------
बॉक्स
संशोधन करा, नव्या संकल्पना राबवा
ना. यशोमती ठाकूर यांनी मेळघाटचा ब्रँड जगभर पोहोचण्यासाठी विपणन पद्धतीचे अधिकाधिक संशोधन करून, अभिनव संकल्पना राबवल्या पाहिजे. मेळघाट महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये विभागाला गेला आहे. मध्यप्रदेशातील उत्पादने, वैशिष्ट्ये, स्वरूप यांचाही विचार प्रकल्पात व्हावा. मेळघाटच्या पारंपरिक उत्पादनांचा समावेश करावा, असेही निर्देश त्यांनी दिले.
------------
बॉक्स
मेळघाटात २५ हजार महिला बचत गट सदस्य
मेळघाटात 'एमएसआरएलएम' व 'माविम'कडून २ हजार ३५९ महिला स्वयंसाहाय्यता गट असून, २५ हजारांहून महिला सदस्य सहभागी आहेत. या उपक्रमात अमरावती शहरात मध्यवर्ती ठिकाणी आधुनिक विक्री केंद्र, माल साठवणुकीसाठी गोदाम, वाहतूक व्यवस्था, तर हरिसाल, धारणी, सेमाडोह व चिखलदरा येथे उत्पादन व संकलन केंद्रे असतील.
----------
मॉलचे संचालन संपूर्णत: महिलांकडेच
मॉलचे संचालन संपूर्णत: महिलांकडेच असणार आहे. विविध गृहोपयोगी, हस्तनिर्मित कला वस्तू, खाद्यपदार्थ, धान्य, सेंद्रिय ताजा भाजीपाला, फळे, वनौषधी आदी उपलब्ध असेल. 'महिला बचत गट आपल्या दारी' उपक्रमात घरपोच सेवेबरोबर ऑनलाईन विक्रीही होणार आहे. याबाबत विक्री केंद्राच्या संकल्पचित्राचे सादरीकरणही करण्यात आले.