१२ जूनपासून अंमलबजवाणी सुरू, खासदारांची मागणी रेल्वेमंत्र्यांकडून मान्य
अमरावती : कोरोनाकाळात रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफार्म तिकीट ५० रुपये करण्यात आले होते. आता संचारबंदीत शिथिलता मिळाल्याने १२ जूनपासून हे तिकीट पुन्हा १० रुपयांचेच करण्यात आले आहे. या निर्णयामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या आप्तांना दिलासा मिळाला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी खासदार नवनीत राणा यांची ही मागणी मंजूर केली.
प्लॅटफार्म तिकिटासाठी ११ मार्चपासून ५० रुपये मोजावे लागत होते. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाविषयी सामान्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. अखेर चार महिन्यांनंतर प्लॅटफार्म तिकिटासाठी पुन्हा १० रुपयेच द्यावे लागतील. महागड्या तिकीटमुळे रेल्वे फलाटावर जाण्याऐवजी बाहेरूनच नातेवाईक, आप्तांना निरोप दिला जात होता.
---------
प्लॅटफार्मचे तिकीट अगोदर ५० रुपये होते. आता १२ जूनपासून पुन्हा १० रुपये घेण्यात येत आहेत. रेल्वे प्रशासनाकडून तसे पत्र प्राप्त झाले आहे.
- पी.के. सिन्हा, प्रबंधक, बडनेरा रेल्वे स्थानक.
--------------
मुंबई एक्स्प्रेस, सुरत पॅसेंजरचे आरक्षण सुरू
अमरावती-मुंबई एक्स्प्रेस ही गाडी १ जुलै, तर अमरावती-सुरत फास्ट पॅसेंजर ३ जुलैपासून सुरू होणार आहे. या दोन्ही रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळणे सुरू झाले आहे. कोरोनाकाळात बंद झालेल्या रेल्वे गाड्या पुन्हा सुरू होत असल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.