लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्याच्या कानाकोपऱ्यातून, वीटभट्ट्याहून, दुर्गम पाड्यातून शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांची आश्रमशाळा समृद्द्धी महामार्गात जमीनदोस्त झाली. त्यामुळे आता शिकायचे कुठे अन् बसायचे कुठे, असे भलेमोठे ‘प्रश्नचिन्ह’ त्यांच्यासमोर उभे ठाकले. तेच प्रश्नचिन्ह घेऊन ते चिमुकले आपल्या पालकांसमवेत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेच्या इमारत, वाचानालय समृद्द्धी महामार्गात उद्ध्वस्त झाली. परिणामी या शाळेला इमारत नाही. वाचानालय नाही. या विवंचनेमुळे ‘प्रश्नचिन्ह’ शाळेत शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे ज्ञानदानच बंद झाले आहे. शाळेत बसायला अन् शिकायलाही जागा नसल्याने येथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. शासनाने आता प्रश्नचिन्ह शाळेला पक्की इमारत, वाचनालय व अन्य सोई-सुविधा नव्याने बांधून द्यावी. या प्रमुख मागणीसाठी विद्यार्थी आपल्या पालकांसमवेत विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले अन् याच परिसरात शाळा भरून आपल्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान, यावेळी प्रतिभा भोसले, रातराणी भोसले, नुरदास भोसले, नलू पवार, वंदना पवार, अधिन भोसले आदींच्या शिष्टमंडळाने मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना दिले. यावर योग्य कार्यवाहीचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिल्याने आंदोलन निवळले.दरम्यान, वंचित घटकातील या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने केलेल्या अभिनव आंदोलनाकडे नागरिकांचेही लक्ष वेधले.
‘हीच प्रार्थना अन् हेच आमचे मागणे’समृद्द्धी महामार्गामुळे जमीनदोस्त झालेली इमारत व अन्य सोई-सुविधा नव्याने बांधून द्यावी, याकरिता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात भरलेल्या शाळेत राष्ट्रगीत, संविधान प्रस्तावनेचे वाचन करीत ‘हीच प्रार्थना अन् हेच आमचे मागणे’ ही प्रार्थना गात उपस्थितांचे लक्ष वेधले.
काय आहेत मागण्या?- मंगरूळ चव्हाळा येथील समृद्द्धी महामार्गात प्रश्नचिन्ह शाळेची इमारत जमीनदोस्त करण्यात आली. यामुळे शाळेला नवीन पक्की इमारत, मुुलाकरिता प्रसाधनगृह, स्नानगृह, विद्यार्थ्यांसाठी पुस्तके, फर्निचरसह वाचनालय बांधून द्यावे, शाळेच्या जुन्या इमारतीलगतची शासनाची ई-क्लास जमीन शैक्षणिक प्रकल्पाकरिता विशेष बाब म्हणून कायदेशीर हस्तांतरित करावी, अशा विविध मागण्या केल्या आहेत.