परतवाडा : प्रत्यक्ष क्षेत्र कमी असताना जास्त प्लॉट असल्याचे दाखवून फसवणूक करणाऱ्या आरोपीस अचलपूर येथील प्रथमश्रेणी न्यायाधीश विशाखा पाटील यांच्या न्यायालयाने मंगळवारी आरोपीस एक हजार रुपये रोख दंड आणि तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली
सुरेश सहादेवराव ठाकरे (५६, रा. दत्तनगर, कांडली, परतवाडा) असे न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. कांडली येथील रहिवासी फिर्यादी आदिवासी झिंगा रिंगा कासदा यांनी २०१४ साली आरोपी सुरेश ठाकरे यांच्याकडून कांडली येथे निवासी प्लॉट विकत घेतला होता. त्यावेळी आरोपीने तो प्लॉट ९३१.६० चौरस फूट असल्याचे सातबारावरून सांगितले होते. प्रत्यक्षात तो प्लॉट मोजमाप केल्यावर ६१२.६० चौरस फूट भरला. त्यामुळे आरोपीने त्याच्याकडे विक्रीकरिता शिल्लक नसतानासुद्धा ३१९ चौरस फूट जागा फिर्यादीला जास्तीची विकली. यावरून फिर्यादीने परतवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून आरोपीविरुद्ध २०१५ मध्ये भादंविचे कलम ४२०, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक अलका निकाळजे यांनी सदर प्रकरणाचा तपास केला व प्रकरणातील सर्व दस्तावेज गोळा करून दोषारोपपत्र येथील प्रथमश्रेणी न्यायधीश विशाखा पाटील यांच्या न्यायालयात सादर केले. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता पंकज माहुरे यांनी ११ साक्षीदार तपासले. यात स्वतः फिर्यादी, खरेदीवरील साक्षीदार तसेच तलाठी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्या. विशाखा पाटील यांच्या न्यायालयाने आरोपी सुरेश ठाकरे याला तीन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.