अमरावती : राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने २६ मार्च रोजी कोविड-१९ च्या अनुषंगाने रेखाकला परीक्षा आयोजित न करण्याचा निर्णय घेतला आहे. शासकीय रेखाकला परीक्षा सवलतींचे गुण देऊ नये, असे निर्देशित केले आहे. या निर्णयामुळे दहावीचे लाखो विद्यार्थी सवलतींच्या वाढीव गुणांपासून वंचित राहणार आहे. हा निर्णय दोन दिवसांत मागे घ्यावा, अन्यथा शासनादेशाची होळी केली जाईल, असा आक्रमक पवित्रा राज्य कलाशिक्षक महासंघाने घेतला आहे.
२४ नोव्हेंबर २०१७ राेजीच्या शासन निर्णयानुसार, शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला प्रकारात प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना माध्यमिक शालांत परीक्षेत प्रविष्ट झालेल्यांना सवलतींचे गुण दिले जाते. त्यानुसार शासनाच्या कला संचालनाच्यावतीने एलिमेंटरी व इंटरमिजीएट ग्रेड परीक्षा उत्तीर्ण असल्यास चित्रकला क्षेत्रातील प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना सवलतीच्या अतिरिक्त गुणांचा लाभ मिळतो. या गुणांपासून विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी शैक्षणिक सत्र २०१९-२० च्या माध्यमिक शालांत परीक्षेत भूगोल विषयाची परीक्षा न घेता इतर विषयांचे सरासरी गुणांच्या आधारे सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा शासनाने निर्णय घेतला. त्याचप्रमाणे चित्रकला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्याबाबत शासन स्तरावर सकारात्मक निर्णय होण्याच्या हालचाली सुरू असताना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने २६ मार्च रोजी कोविड-१९ च्या अनुषंगाने रेखाकला परीक्षा आयोजित न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. येत्या दोन दिवसांत अन्यायकारक शासनादेश रद्द न झाल्यास काळ्या फिती लावून निषेध केला जाईल, असा इशारा राज्य कलाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष विनाेद इंगोले, प्रल्हाद साळुंके, प्रल्हाद शिंदे, किरण सरोदे, राजेश निंबेकर, मिलिंद शेलार आदींनी दिला आहे.