वैभव बाबरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पर्यावरणपूरक गणेश मूर्तीच्या नावाने शहरात गणेशमूर्ती विक्रीवर तब्बल १०० टक्के नफा मिळवित सर्रास भक्तांची लूट सुरू झाली आहे. कुंभार समाज बांधव ९ इंच उंचीची गणेश मूर्ती शंभर रुपयांत विक्री करीत आहे. मात्र, तीच मूर्ती बाजारपेठेत २०० ते २५० रुपयांत विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाच्या नावावर काही जणांचे चांगभलं सुरू असल्याचे वास्तव आहे.मातीची गणेशमूर्ती विसर्जनावेळी पाण्यात सहजतेने विरघळत असल्यामुळे पर्यावरणपूरक गणेश स्थापनेला आता विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी मातीचे गणपती बसवा, याविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. त्यामुळे अमरावती, बडनेरा शहरात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्थापनेवर नागरिकांनी भर दिला आहे. प्लॉस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीविक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता पर्यावरणपूरक गणेशमूर्तीच्या व्यवसायात अनेकांनी उडी घेतली आहे. पूर्वी कुंभार समाज आणि प्रसिद्ध मूर्तिकार हेच गणेशमूर्ती तयार करीत होते. मात्र, आता गणेशमूर्ती तयार करणे आणि विक्री व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. कुंभार समाज बांधवांकडून माफक दरात गणेशमूर्ती विकत घेऊन, त्याच मूर्ती बाजारपेठेत दुप्पट, तिप्पट भावात विक्री करण्याची शक्कल अनेकांनी लढविली आहे. किंबहुना पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विक्रीतून अनेकांना रोजगार मिळाले. गत काही वर्षांपासून मातीच्या गणेशमूर्ती स्थापनेसाठी अनेक संस्थांनी पुढाकार घेत जनजागृती सुरू केली आहे. जनजागृतीसह गणेशमूर्ती विक्रीतही या संस्थांनी पुढाकार घेतला आहे. कुंभारवाडा येथील काही मूर्तिकार मातीच्या मूर्ती तयार करतात. नऊ इंच उंचीची गणेशमूर्ती ते शंभर रुपयात विक्री करतात. त्याचप्रमाणे १ फुटाची २०० ते २५० रुपयात तर दोन फुटांची ६०० रुपयांत विक्री करतात. याच कुंभार व्यावसायिकांकडून खरेदी केलेल्या गणेशमूर्तींची बाजारपेठेत चढ्या दराने विक्री होत आहे. गणेशमूर्ती विक्रीवर २० ते २५ टक्के नफा घेणे अपेक्षित आहे. मात्र, बाजारपेठेत त्याच मूर्तींची चढ्या दराने विक्री केली जात आहे. नऊ इंचाची मूर्र्ती २५० रुपये, एक फुटाची मूर्ती ३५० ते ४५० तर दोन फुटांची मूर्ती ९०० ते ११०० रुपयांपर्यंत विक्री करून एकप्रकारे भाविकांची आर्थिक लूट चालविली आहे. या लुटीवर कुणाचेही नियंत्रण नाही. विघ्नहर्त्याची स्थापना विघ्न दूर होण्याच्या उद्देशाने केली जाते. मात्र, विघ्नहर्त्याची मूर्ती विक्री करणाऱ्यांनीच आता स्वत:च्या लाभासाठी भक्तांवर आर्थिक विघ्न आणण्याचा सपाटा लावला आहे.नेहरू मैदानावर मूर्तींची विक्री, चौका-चौकांत स्टॉलगणेशमूर्र्ती विक्रीसाठी नेहरू मैदानावर दुकाने थाटण्यात आली आहेत. कुंभार समाजातील अनेकांनी तेथे मूर्ती विक्रीस ठेवलेल्या आहेत. तेथे दुकान लावण्यासाठी त्यांना पाच हजारांवर शुल्क भरावे लागतात. मात्र, गेल्या काही वर्षांत कुंभार बाधंवांच्या मूर्ती विक्रीविना शिल्लक राहत असल्याचे वास्तव आहे. नेहरू मैदानाशिवाय शहरातील विविध परिसरात रस्त्यावरच गणेश मूर्ती विक्री केली जाते. अशातच जागोजागी रस्त्याच्या कडेला पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची जाहिरात करून मूर्ती विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. मूर्ती विक्रीचे अधिकृत स्थळ असलेल्या नेहरू मैदानातील दुकानदारांजवळील मूर्ती तशाच पडून राहतात. त्यामुळे विक्रीवर मोठा परिणाम जाणवतो.विक्रीविना शिल्लक राहतात मूर्र्तीकुंभारवाडा परिसरात ५० पेक्षा अधिक घरांमध्ये गणेशमूर्ती तयार केल्या जातात. बेनोडा व सावरगाव येथून माती आणून गणेशमूर्तीची निर्मिती करतात. गत अनेक वर्षांपासून परपंरागत व्यवसायातून कुंभारबांधव माफक दरात मातीच्या मूर्तींची विक्री करतात. मात्र, तरीसुध्दा गणेशमूर्ती शिल्लक राहतात. ‘पर्यावरणपूरक गणपती बसवा’ जागृती करणाऱ्यांच्या मूर्तिलाच सुगीचे दिवस आले आहे. त्यामुळे कुंभारांकडील मुर्तिंकडे विशेष लक्ष दिले जात नाही. परिणामी दरवर्षी कुंभार बांधवाकडे गणेशमूर्ती पडून राहत असल्याची ओरड आहे.चढ्या दराने विक्री हे अयोग्यच : जयंत वडतकरपर्यावरणपूरक मातीच्या गणपती मूर्तींची मागणी वाढल्याने आर्थिक गणित म्हणून बघितले जात आहे. मातीच्या मूर्ती अधिक प्रमाणात बाजारात आल्यास आर्थिक लुटीचा प्रकार थांबेल. भाविकांकडे पर्याय नसल्याने काही जण चढ्या दराने विक्री करतात. पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची माफक दरात विक्री अपेक्षित आहे. धार्मिक भावनेतून ग्राहकांची लूट करणे हे चुकीचे आहे, असे वन्यजीव व पर्यावरण संस्थेचे सचिव जयंत वडतकर म्हणाले.