अमरावती : पीएम किसान योजनेचा १४वा हप्ता गुरुवारी सकाळी ११:०० वाजता वितरीत होणार आहे. तसे केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे. यानुसार जिल्ह्यात ई-केवायसी केलेल्या २.६० लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात गुरुवारी प्रत्येकी दोन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेमध्ये एप्रिल ते जुलै २०२३ यादरम्यान दोन हजारांचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात राजस्थान राज्यातील सीकर येथून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याद्वारा ऑनलाइन प्रक्रियेद्वारे जमा करण्यात येणार आहे. कृषी विज्ञान केंद्रांवर लिंकचा वापर अधिकतम शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्याचे निर्देश कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी कृषी विभागाला दिले आहेत.
या योजनेद्वारे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात केंद्र शासनाद्वारा वर्षाला दोन हजारांच्या तीन हप्त्यात प्रत्येकी सहा हजारांचा लाभ दिला जातो. डिसेंबर २०१९पासून ही योजना सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत १३ हप्त्यांचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला आहे. ई-केवायसी नसल्याने अनेक शेतकऱ्यांना १३व्या हप्त्याचा लाभ मिळाला नव्हता. परंतु, आता ८४ टक्के शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया केली आहे.ई-केवायसी केलेले शेतकरी : २,५९,८९६अद्याप इ-केवायसी नसलेले : ४९,२३१आधार लिंक शेतकरी : ३,०८,७००अपात्र असल्याने वसुलपात्र शेतकरी : १२,१०६