चांदूर रेल्वे : शासनाकडून नुकतेच पीएम किसान योजना, निराधार, अपंग, श्रावणबाळ आदी योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात पाठविले आहे. ते पैसे काढण्यास शहरातील बँकेत ग्राहकांची गर्दी होत आहे. राष्ट्रीयीकृत बँकेत पंचक्रोशीतून नागरिकांची होणारी गर्दी पाहता तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी बँक व्यवस्थापक, पोस्टमास्तर यांच्या बैठकीतून पोस्ट व बँक मित्रामार्फत गावातच पैसे वितरणाचे निर्देश दिले. त्यामुळे आता काही प्रमाणात बँकांतील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
बँकेत गर्दी होऊ नये यासाठी राष्ट्रीयकृत बँकेतील पीएस किसान, जनधन, निराधार, अपंग, श्रावण बाळ आदी योजनांचे तसेच इतरही ५ हजार रूपयापर्यंत रक्कम राष्ट्रीयकृत बँक खात्यामधून काढण्यासाठी ग्राहकांना चांदूर रेल्वेत येणाची आवश्यकता नसल्याचा निर्णय घेण्यात आला. संबंधित गावातील पोस्टमनद्वारे, राष्ट्रीयीकृत बँकांचे ग्रामीण स्तरावर काम करणारे बँक मित्रांद्वारे सदर रक्कम त्या ग्राहकाला गावात मिळणार आहे. ग्राहकांना सोबत बँकेचे खाते पुस्तक, आधार कार्ड आणावे लागतील. तसेच पैसे काढताना सर्वांना सोशल डिस्टन्सिंग ठेवणे गरजेचे आहे. बैठकीत झालेल्या या निर्णयामुळे शहरातील बँकांतील गर्दी कमी होणार आहे. कोरोनाच्या काळात कुठेही नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी तहसीलदार राजेंद्र इंगळे यांचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे.
या गावात काढा पैसे
पोस्टव्दारे आमला, बग्गी, भानखेडा, धानोरा, घुईखेड, जळका जगताप, जवळा, कळमगाव, कारला, कवठा कडू, मालखेड, मांजरखेड कसबा, निमगव्हाण, मार्डी, पळसखेड, पिंपळखुटा, पोहरा, सातेफळ, सावंगी मग्रापूर, शिरजगाव कोरडे, सोनोरा या गावांत ब्रांच पोस्टमास्तर अथवा सहायक ब्रांच पोस्टमास्तर हे ५ हजार रूपये पर्यंतची राष्ट्रीयीकृत बँक खात्यातील रक्कम गावात काढून ग्राहकांना देऊ शकते.