अमरावती : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत राज्यातील पात्र ९९.३७ लाख शेतकऱ्यांना आतापर्यंतचे दोन हजार रुपयांच्या १४ हप्त्यांचा लाभ मिळाला आहे. या धर्तीवर राज्य शासनाच्या नमो शेतकरी महाकल्याण निधीची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आलेली आहे. याबाबत मात्र तारीख पे तारीख सुरु असल्याने दुष्काळी परिस्थितीत शेतकरी निधीच्या प्रतीक्षेत आहेत.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेद्वारे राज्यातील पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार म्हणजेच दर चार महिन्यांत प्रत्येकी दोन हजार रुपयांचा लाभ मिळत आहे. डिसेंबर २०१९ पासून आतापर्यंत दोन हजार रुपयांचे प्रत्येकी १४ हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहेत. याच योजनेच्या सर्व पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी महाकल्याण योजनेद्वारे वर्षाला सहा हजार रुपये देण्याची घोषणा राज्य शासनाद्वारे करण्यात आली होती व याला ३० मे २०२३ च्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आली. या संदर्भातील शासनादेश १५ जूनला निर्गमित करण्यात आला. त्यानंतर योजनेचे काम थंड्या बस्त्यात पडले आहे.