गणेश वासनिक।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरालगतचे पोहरा, मालखेडचे राखीव जंगल म्हणजे अमरावती शहराचा श्वास आणि आॅक्सिजनचा पुरवठा करणारे फुफ्फुस अशी ओळख. जैवविविधतेने संपन्न हा अधिवास आहे.अमरावती ते चांदूर रेल्वे, कोंडेश्वर ते मार्डी मार्गावर जंगल विस्तारलेले आहे. वडाळी, पोहरा, मालखेड, चिरोडी, कोंडेश्वर, हातला असे राखीव जंगल जवळपास १४० किमी एवढे आहे. वन्यप्राण्यांच्या उपलब्धतेमुळे ब्रिटिशकाळात वडाळी, मालखेड जंगलाचा भाग ‘गेम रिझर्व्ह’ म्हणजेच शिकारीसाठी राखून ठेवला होता. या जंगलास अभयारण्याचा दर्जा मिळावा, यासाठी २० वर्षांपासून वन्यजीवप्रेमी प्रयत्न करीत आहेत. मेळघाटात पाहता येतील ते सर्व प्राणी या जंगलात आढळतात. वाघदेखील या जंगलात अधूनमधून दिसून येतो. तो वर्ष-दोन वर्षे मुक्काम करतो, हे यापूर्वी सिद्ध झाले आहे. बिबट्यांची संख्या २० च्या जवळपास आहे. लांडगे, कोल्हे, तडस, हरिण, चितळ, काळवीट असे सस्तन प्राणी आढळून येतात. ठिकठिकाणी पाणवठे, तलाव, बंधारे आहेत. वनस्पतीच्या २०० पेक्षा जास्त प्रजाती आणि स्थानिक व स्थलांतरित असे मिळून २८५ पक्षिप्रजाती आहेत. सापाच्या १८ प्रजाती, १० प्रकारचे सरपटणारे प्राणी, माशांच्या १७ आणि फुलपाखरांच्या ७५ प्रजाती आहेत. जंगलातील पाण्यावर ब्रिटीश काळात छत्री तलाव, वडाळी हे दोन तलाव बांधल्या गेले आहेत.कोरोनामुळे जंगलातील मानवी हस्तक्षेप थांबला आहे. त्यामुळे वन्यप्राणी-पक्षी, झाडांनी मोकळा श्वास घेतला आहे.जिल्ह्यात १८११ जैवविविधताअमरावती जिल्ह्यात पक्षी, वनस्पती, साप, सस्तन प्राणी, फुलपाखरे, औषधी, पीक वाण अशा एकूण १८११ जैवविविधता असल्याची नोंद आहे. यामध्ये मेळघाटात सर्वाधिक असून, पोहरा, मालखेडचे जंगल, सालबर्डीचे जंगल, सातपुडा, वरूड तालुक्यातील महेंद्री तलाव, केकतपूर तलाव आदी ठिकाणी जैवविविधता आहे. वनस्पतीच्या १००८ प्रजाती असून, पक्षी ३९४, साप ३२, सस्तन प्राणी ३७, फुलपाखरे १३०, औषधी वनस्पती १५०, पीक वाणाच्या ६० प्रजातींची नोंद आहे. मेळघाटात साग वृक्षासह वाघ, राज्य प्राणी शेकरू, जंगली कुत्रा, कोल्हा, लांडगा, खोकड, तरस, अस्वल, चांदी अस्वल, मसण्याउद, सायाळ, रानगवा, सांबर, भेकर, चितळ, चौसिंगा, नीलगाय, चिंकारा, खवले मांजर, रानडुक्कर, खार, वटवाघूळ, ससा आदींचा समावेश आहे.पोहरा, मालखेडच्या राखीव जंगल हे मेळघाटनंतर जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. तब्बल २९० पक्षिप्रजातींची नोंद येथे झाली आहे. या जंगलाला अभयारण्य घोषित करावे, या मागणीचा २० वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. गावे, शेतीसंदर्भात प्रशासकीय अडचणी येत असल्या तरी दोन्ही बाजूचा समतोल साधावा लागेल. तेव्हाच येथील जैवविविधतेचे संवर्धन करता येईल.-जयंत वडतकर, पर्यावरणतज्ज्ञमेळघाटनंतर पोहरा, मालखेड जंगलात जैवविविधतेचे भांडार आहे. निरनिराळे प्राणी, पक्षी यांचे वास्तव्य आहे. मानवी हस्तक्षेप वाढण्यापूर्वी हे जंगल अभयारण्य घोषित व्हावे. भिन्न प्रजातींच्या अधिवासाचे संवर्धन करणे हे प्रशासन, पक्षिमित्र, वन विभागासोबतच स्थानिकांचीही जबाबदारी आहे.-गजानन वाघ, प्राणितज्ज्ञ
पोहरा, मालखेड जंगल जैवविविधतेचे भांडार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 5:00 AM