परतवाडा (अमरावती) : अचलपूर तालुक्यातील पाथरूड प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कुंबी वाघोली येथील १८ मुलांना चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने विषबाधा झाली. या सर्वांना उपचारार्थ अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात सायंकाळी दाखल करण्यात आले. या सर्व मुलांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
बुधवारी ६ जानेवारीला वयवर्ष दोन ते १२ पर्यंत ची ही कुंभी वाघोली येथील मुले खेळण्याकरिता गावाबाहेर पोहोचली. खेळताना त्यांनी चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्या थोड्यावेळाने अस्वस्थ वाटू लागल्याने ते आपापल्या घरी पोहोचले. यातील मुलांनी घरी उलटी केली. मुलांची प्रकृती खालावत असल्याचे बघून गावकऱ्यांच्या मदतीने जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षक संध्या तायडे यांनी त्यांना प्रथम रोड प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले तेथून अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात सायंकाळी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी त्यांच्यावर औषधोपचार करीत आहेत.