अमरावती : पोळ्याच्या करीला पोलिसांनी छापा टाकला असता अपार्टमेंटवरुन खाली पडून मनीष पेठे यांचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणात निलंबित सहा पोलीस कर्मचाऱ्यांना सीबीआयकडून क्लिनचिट मिळ्याने ते शुक्रवारी रात्रीपासून सेवेवर पुन्हा रुजू झालेत. सप्टेंबर २०१३ मध्ये गाडगेनगरचे ठाणेदार जी.जी. सोळंके यांच्या निर्देशावरून तीन पोलीस उपनिरीक्षक आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी आशियाड कॉलनीतील गुरुवंदना अपार्टमेंटमध्ये जुगार सुरु असल्याच्या माहितीवरुन धाड टाकली होती. त्यावेळी मनीष पेठे (३०) यांचा तिसऱ्या माळ्याहून पडून मृत्यू झाला. याबाबत संशय व्यक्त करीत त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांमुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला होता. त्यावेळी उच्च न्यायालयाकडे अपिल करुन नातेवाईकांनी सीबीआईकडून चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. तेव्हापासून या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत सुरू होता. न्यायालयाच्या आदेशावरून तत्कालीन पोलीस आयुक्त अजित पाटील यांनी पोलीस निरीक्षक जी.जी. सोळंके, पोलीस उपनिरीक्षक अरविंद पवार, भगवान कोळी, जमादार संजय सरोदे, ईशा खांडे व बबलु कावरे यांना निलंबित केले होते. सीबीआयकडून झालेल्या चौकशीत निलंबित पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना क्लिनचिट मिळाल्याने ते सेवेत रुजू झाले आहेत.
दीड वर्षांपासून निलंबित पोलीस पुन्हा रुजू
By admin | Published: January 10, 2015 10:46 PM