शॉपअॅक्ट नोंदणी प्रमाणपत्राचा गैरवापर : सहायक कामगार आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शॉपअॅक्ट नोंदणी प्रमाणपत्रात नमूद केलेल्या व्यवसायाला फाटा देऊन गैरमार्गाने अन्य व्यवसाय चालविणाऱ्या ‘कसबा कॅफे’विरूद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार नोंदविण्यात आली. सहायक कामगार आयुक्तांच्या आदेशाने दुकाने निरीक्षक संजय दिघडे यांनी ही तक्रार नोंदविली आहे. हुक्का पार्लर्सच्या आडून सुरू असलेल्या गैरप्रकारांमुळे शहराच्या सुसंस्कृतपणाला गालबोट लागत असल्याने पोलिसांनी शहरातील सहा हुक्का पार्लरवर धाड टाकली होती. यातील ‘अड्डा-२७’ व ‘कसबा कॅफे’ मध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याचा पोलिसांचा संशय बळावला होता. दरम्यान रेल्वे स्थानक ते बसस्थानक मार्गावरील ‘अड्डा-२७’ मध्ये हुक्का पार्लरसोबतच ‘डान्स पार्लर’सुरू असल्याचे बजरंग दलाने निदर्शनास आणून दिले. त्यानुसार पोलिसांनी ‘अड्डा-२७’ वर धाड टाकून चौकशी सुरू केली. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी शहरातील हुक्का पार्लर बंद करण्याचे आदेश दिले होते. पोलीस चौकशीदरम्यान ‘अड्डा-२७’ व ‘कसबा कॅफे’ने सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील शॉपअॅक्ट नोंदणी प्रमाणपत्राच्या आधारे हुक्का पार्लर चालविल्याचे निदर्शनास आले. हा असंस्कृत व्यवसाय अमरावतीच्या पवित्र मातीत फोफावत असल्याने याबाबत कामगार आयुक्तांकडे तक्रार केली गेली. आयुक्तांच्या आदेशाने दुकाने निरीक्षकांनी शहरातील हुक्का पार्लर्सची झडती घेऊन संबंधित व्यावसायिकांचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याची नोटीस बजावली. त्यानंतर या व्यावसायिकांनी शॉपअॅक्ट नोंदणी प्रमाणपत्राचा गैरवापर करून नमूद व्यवसायाशिवाय अन्य व्यवसाय सुरू कल्याचे स्पष्ट झाले होते. हा प्रकार नियमांचे उल्लंघन तसेच शासनाची दिशाभूल करणारा असल्याचे सहायक कामगार आयुक्तांच्या निदर्शनास आले. चौकशी सुरूअमरावती : त्यांनी हुक्का पार्लरविरूद्ध फौजदारी दाखल करण्याचे लेखी आदेश दुकाने निरीक्षकांना दिले. त्यानुसार सोमवारी संजय दिघडे यांनी गाडगेनगर पोलीस ठाणे गाठून ‘कसबा कॅफे’ची नोंदणी प्रमाणपत्र घेणाऱ्या गौरव सत्यनारायण खंडेलवालविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार नोंदविली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.‘स्त्री संवेदना मंच’चा ‘लोकमत’ला सलाम सांस्कृतिक शहराला असांस्कृतिकतेचे गालबोट लावणाऱ्या ‘हुक्का पार्लर’ संस्कृतीचा पर्दाफाश करून तरूणाईला दिशाहिन होण्यापासून वाचविल्याबद्दल ‘स्त्री संवेदना मंच’ने ‘लोकमत’चे कौतुक केले. लोकमतने सतत जाणिव जागृतीसह समाजविघातक प्रश्नांना उचलून धरून त्यांचा सातत्याने पाठपुरावा करावा, अशी अपेक्षाही स्त्री संवेदना मंचने व्यक्त केली. यावेळी स्त्री संवेदना मंचच्या सुचिता बर्वे, पौर्णिमा काळे, बबिता आठिया, नम्रता कडू, जया भाकरे, सुनंदा कोकाटे, मंदा काळे आदींची उपस्थिती होती. सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील दुकाने निरीक्षकाने कसबा कॅफेविरूद्ध तक्रार नोंदविली आहे. वरिष्ठांसोबत चर्चा करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. -बी.पी.राठोड, पोलीस उपनिरीक्षक, गाडगेनगर
कसबा कॅफेविरुद्धही पोलिसात तक्रार
By admin | Published: May 23, 2017 12:01 AM