अनिल कडू
परतवाडा : स्थानिक पोलिसांना प्रत्येक गोष्टीत नागरिकांचा सहभाग हवा आहे. यात नागरिकांनाच सर्व करायचे आहे. परिसरात भंगार, कचरा गोळा करणाऱ्यांचे फोटो काढण्याचे त्यांनी नागरिकांना सुचविले आहे. याकरिता त्यांनी व्हाॅट्स ॲपवर १५ कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार बाहेरगावी जाताना घरात मौल्यवान दागिने व पैसे ठेवू नका, सुरक्षित ठिकाणी किंवा लॉकरमध्ये ठेवा, आजूबाजूचे लोकांना माहिती द्यावी, असे सुचविले आहे.
सोने चमकवणारे, एखादी स्किम सांगणारे, घरकुलाबाबत माहिती, पैसे पुरवितो, असे सांगणाऱ्या भामट्यापासून सावध रहा. मोबाईल संबंधाने फ्रेंडशिप करणारे, लॉटरी लागल्याची माहिती देणारे, मिल्ट्री मध्ये आहे, असे सांगून कार विक्री करणारे, ओटीपी व इतर दस्तऐवज मागणाऱ्या व्यक्तींकडून सावध रहा. सोशल मीडियावरून बदनामी करतो. आपल्याला एक्सपोज करतो, असे म्हणणाऱ्या भामट्यांना घाबरू नका. पोलिसांची भीती दाखविणाऱ्या तोतया पोलिसांना दाद देऊ नका. शहरातील दादांना व त्यांच्या गँगला मुळीच घाबरू नका. अशांच्या पालनकर्त्यांची माहिती पोलिसांना द्या. शहरातील ट्राफिक सुधारण्यास स्वतःपासून सुरुवात करा. प्रदूषण मुक्त शहर ठेवण्याकरिता स्वतः जनजागृती करा. प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती पर्यावरणाला हानिकारक आहे. कोरोना बाबत सतर्क रहा. नियमांचे पालन करा. यासह अन्य मुद्दे आपल्या पंधरा कलमी कार्यक्रमात परतवाडा पोलिसांनी जाहीर केले आहेत.
परतवाडा पोलिसांच्या या पंधरा कलमी कार्यक्रमांतर्गत सर्वच गोष्टी नागरिकांना करावयाच्या आहेत. स्वतःची सुरक्षा स्वतःला ठेवायची आहे. यानंतर त्याची माहिती पोलिसांना द्यायची आहे. नागरिकांना या अशा प्रकारचे निर्देश देण्याकरिता परतवाडा पोलीस नेहमीच व्हाॅट्सअप ग्रुपवर सक्रिय असतात. प्रत्येक गोष्ट पोलीस करू शकत नाहीत. लोकसंख्येच्या मानाने पोलीस कमी पडतात. पोलीस कुठे कुठे लक्ष देणार. रस्त्यावर बसणाऱ्या मोकाट जनावरांना आवरणार की, चोरांना पकडणार, की घडलेल्या घटनांची माहिती पत्रकारांना देणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दिनांक 01/09/21. फोटो दिनांक 03/09/21