अमरावती : घुंगशी बॅरेज प्रकल्पात मायलेकीच्या बुडून मृत्यूप्रकरणी पती गौरव सुरेश तायडे (३०, रा. पारद, ता. मूर्तिजापूर) याच्याविरुद्ध दर्यापूर पोलिसांनी १२ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता ही घटना घडली होती. प्रिया गौरव तायडे (२४), आराध्या गौरव तायडे (३) असे मृत माय-लेकीचे नाव आहे.
पारद येथील हे कुटुंब दर्यापूर तालुक्यातील धामोडी येथे मुक्कामाला राहून रविवारी परत निघाले होते. धामोडी ते पारद दरम्यान पूर्णा नदीवर घुंगशी बॅरेज प्रकल्पावर ते पाण्यात बुडत असल्याचे लक्षात आल्याने नागरिकांनी वाचविण्यासाठी धाव घेतली. यात मायलेकीला वाचवण्यात उपस्थितांना यश आले नाही. दरम्यान याप्रकरणी प्रियाच्या आईने दर्यापूर पोलिसात १२ फेब्रुवारी रोजी नोंदविलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गौरवविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला.
तक्रारीनुसार, १२ मे २०१८ रोजी गौरव व प्रिया यांचे लग्न झाले. दुसऱ्या दिवसापासून अनैतिक संबंधामुळे गौरवने तिचा छळ चालविला. तिचा शारीरिक छळ होत होता तसेच माहेराशीही संबंध ठेवण्यास मनाई करण्यात आली. या छळाला कंटाळून तिने पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली. दर्यापूर पोलिसांनी मृत प्रिया तायडे (२४) हिच्याविरुद्धदेखील मुलीसह आत्महत्याप्रकरणी कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीला अटक
दर्यापूर पोलिसांनी शनिवारी गौरव तायडे याला अटक केली. त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.