अमरावती: शहरात सोमवारी झालेल्या तोडफोड, लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हाधिकारी सौरभ कटियार व जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी पांढरी खानमपूर येथे भेट दिली. येथे मंगळवारी ग्रामसभा आयोजित होती. यामध्ये उपस्थित दोन हजार नागरिकांनी हात उंचावून यापूर्वीचे दोन्ही ठराव एकमताने रद्द केले.
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथे प्रवेशद्वार कमानीवरून तणावपूर्ण स्थिती आहे. येथील काही नागरिकांनी ७ मार्चपासून अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू असताना ११ मार्चला या आंदोलनाला गालबोट लागले. आंदोलनकर्त्यांद्वारा दगडफेड, वाहनाची मोडतोड करण्यात आली. तर पोलिसांद्वारा अश्रुधूर व लाठीचार्ज करण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर मंगळवारच्या ग्रामसभेसाठी ४०० वर पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होता. यामध्ये २६ जानेवारी २०२० व २०२४ रोजी घेतलेला प्रवेशद्वाराबाबतचा ठराव क्रमांक ५ आणि ठराव क्रमांक ७ रद्द करण्यात आला आहे. याबाबत निर्णय बहुमताने व अविरोध पारित झाला. गावच्या प्रवेशद्वारावर सशस्त्र पोलिस तैनात होते. गावात पोलिस पथके आळीपाळीने गस्त घालत होती.